औरंगाबाद : नैसर्गिक आपत्तीमुळे दोन मोहिमांत अडथळा आला होता. तर, तिसऱ्या मोहिमेसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट नव्हतो. यावर्षी काय होणार याचे दडपण होते, भीतीही वाटत होती; परंतु एकदा का शिखरावर असले तर सर्व काही विसरून जातो. तेथे तुम्हाला अद्भुत ऊर्जा मिळते. हवामान चांगले होते आणि त्यामुळे एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न साकार झाले, असे मत एव्हरेस्टवीर शेख रफिकने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. हिमदंशाच्या उपचारासाठी आपण लवकरच मुंबईला जाणार असून, त्यातून सावरल्यानंतर पुढचे ध्येय ठरवू, असेही तो म्हणाला.औरंगाबादचा पोलीस नाईक शेख रफिकने १९ मे रोजी जगातील सर्वोच्च असे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पराक्रम केला. त्यानंतर प्रथमच तो बुधवारी सकाळी ६.३0 वाजता औरंगाबादेत दाखल झाला. रफिकचा लोकमत समूहातर्फे सायंकाळी ५ वाजता सत्कार झाला. याप्रसंगी लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, संपादक सुधीर महाजन, चक्रधर दळवी, अमिताभ श्रीवास्तव, योगेश गोळे, संचालक बालाजी मुळे, योगेश गोळे, सहा. उपाध्यक्ष संदीप विश्नोई, अनिल इरावने यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शेख रफिकने आपला चित्तथरारक अनुभव कथन केला. तो म्हणाला, एव्हरेस्टसाठी दोन वर्षांपासून मेहनत करीत होतो. प्रत्यक्ष मोहिमेला जाण्याआधी तुम्हाला बेस पॉइंटवर दोन ते अडीच महिने वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी टेक्निकल प्रॅक्टिस करावी लागते. १७ मे रोजी पहाटे ३ वाजता बेस पॉइंटवर चढायचे होते; परंतु रात्री १२ वाजेपर्यंत आपण फोनवरच बोलत होतो; त्या दिवशी झोप झाली नाही. अशक्तपणा जाणवत होता; पण एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचे स्वप्न उरी बाळगले होते. १८ मे रोजी साऊथकोल येथून ८.३0 वाजता चढाई सुरू केली.>रफिकचे जोरदार स्वागतमुंबईहून शेख रफिकचे विमानाने सकाळी ६.१५ वाजता आगमन झाले. त्यावेळी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्धपणे टाळ्या वाजवत रफिकच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी रफिकचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर विमानतळावर पोलिसांच्या खुल्या जीपमध्ये रफिकची पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.शुक्रवारी होणार नागरी सत्कारएव्हरेस्टवीर शेख रफिक याचा १० जून रोजी सकाळी ११ वाजता संत तुकाराम नाट्यगृह येथे नागरी सत्कार होणार असल्याचे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.पोलिसांनी मोहिमेसाठी दिला पगारया मोहिमेसाठी खूप लोकांनी मला प्रोत्साहित केले आणि आपापल्या परीने मदतही केली. काही पोलिसांनी मला एका दिवसाचा पगारदेखील या मोहिमेसाठी दिला, असे रफिकने सांगितले.
जिद्दीने केले एव्हरेस्ट सर !
By admin | Published: June 09, 2016 4:38 AM