पोलादपूर : एव्हरेस्टवीर राहुल येलंगे याला गावाने वाळीत टाकल्याची वृत्ते निराधार असल्याचे तेथील ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडली. मुंबई मंडळाचे अध्यक्ष भार्गव कदम यांनी ‘एव्हरेस्टवीर राहुल येलंगे याला वाळीत टाकण्याचा प्रश्नच येत नाही. भावकीतील वादाला वाळीत प्रकरणाचा रंग देण्यात आला आहे,’ असे या वेळी स्पष्ट केले. राहुल येलंगे याला जी-जी मदत लागेल, ती सर्व आम्ही ग्रामस्थ करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. भोगाव गावात येलंगेवाडी असून, या वाडीत आठ घरे आहेत. मात्र भावकीतील वादाला वाळीत टाकल्याची कलाटणी मिळाल्याने भोगाव गावासोबत पोलादपूर तालुक्याचेही नाव बदनाम झाल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. भोगाव गावात एकूण १०० घरांपैकी ९२ घरांशी राहुल येलंगे यांचे घरोब्याचे संबंध आहेत. त्याला ग्रामस्थांकडून कुठलाही त्रास होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावाच्या प्रत्येक कार्यक्र मात राहुल याला बोलावले जाते, तसेच ग्रुपग्रामपंचायत भोगावकडून त्याला स्वयंरोजगारासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केल्याचे सरपंच राकेश उतेकर यांनी या वेळी नमूद केले. ग्रामपंचायतीकडून राहुल यांच्या कर्तबगारीचा एव्हरेस्टवीर म्हणून सत्कार आयोजित केला होता. त्याच्या सत्काराचे प्रमाणपत्र पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी दाखवले तसेच आतापर्यंत राहुल येलंगे याच्यासोबत झालेले व्यवहार, त्याला केलेले सहकार्य यासंदर्भातली कागदपत्रांची फाईल सादर केली. या वेळी भोगाव ग्रामस्थांसह मुंबई, पुणे मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
एव्हरेस्टवीराला वाळीत टाकले नाही
By admin | Published: January 19, 2015 4:40 AM