योगेश पांडेनागपूर, दि. 11 : उत्तरप्रदेशमधील भाजपाच्या अभूतपुर्व यशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मौलिक वाटा राहिला. पडद्याआड कार्य करत संघ परिवारातील विविध संघटनांनी विजयाचा पाया रचला. निवडणूकांच्या काही काळ अगोदरपासून संघ परिवाराने हर घर एक व्होट ही मोहिमच राबविली. या मोहिमेमुळे तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यात भाजपाला मोठी मदत झाली. संघाचे काही पदाधिकारीदेखील निवडणूकांच्या काळात उत्तरप्रदेशमध्ये विशेष सक्रिय झाले होते हे विशेष.
२०१४ मधील लोकसभा निवडणूकांत उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे भाजपाचा प्रचार केला होता. देशात समान नागरी कायदा अस्तित्वात यावा, यासाठी संघाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी राज्यसभेतील भाजपाचे संख्याबळ वाढण्यासाठी उत्तरप्रदेशात सत्ता येणे अत्यावश्यक होते. ही बाब संघाचे पदाधिकारी जाणून होते. दिल्ली, बिहारमध्ये झालेल्या पराभवानंतर संघाने उत्तरप्रदेशवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते.
अखिल भारतीय सहसरकार्यवाह कृष्णगोपाल यांच्यासह संघाचे अनेक अखिल भारतीय प्रतिनिधींनी उत्तरप्रदेशमध्ये संघवाढीवर विशेष भर दिला. मतदानाचा टक्का वाढावा व भाजपासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी संघ परिवाराच्या विविध संस्थांना पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत होते. विहिंपदेखील सक्रियघरवापसी व गोरक्षकांच्या वादामुळे विश्व हिंदू परिषदेमध्ये भाजपाबाबत काहीसा नाराजीचा सूर होता. मात्र उत्तरप्रदेश निवडणूकांचे महत्त्व विहिंपला माहिती असल्याने त्यांचे कार्यकर्तेदेखील प्रचारादरम्यान सक्रिय होते. डिसेंबर २०१६ मध्ये नागपुरात विहिंपची केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रतिनिधी मंडळाचे संयुक्त अधिवेशन झाले होते. त्यात विहिंपचे संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन यांनी स्पष्ट संकेतदेखील दिले होते.सामाजिक समरसतेवर संघाचा भर२०१५ साली नागपुरात झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान संघाने सामाजिक समरसतेचा ठराव संमत केला होता. देशभरात त्यानंतर विविध सर्वेक्षणे घेण्यात आली व संघ सर्व जातीधर्मांसोबत आहे हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी संघ स्वयंसेवक कार्याला लागले. उत्तरप्रदेशमध्ये सामाजिक समरसतेसंदर्भात विशेष मोहिम राबविण्यात आली. यामुळे सर्व जातीधर्माच्या मतदारांपर्यंत एक सकारात्मक संदेश गेला होता, अशी माहिती संघाच्या सूत्रांनी दिली.