पुणे : स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून राज्यातील शाळांमध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ विद्यालय’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये शाळांमध्ये ‘हॅण्डवॉश स्टेशन्स’ सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजन घेण्याआधी कधी हात धुवावेत, तसेच ते कशा पद्धतीने धुवावेत, याबाबत युनिसेफ संस्थेने जालना जिल्ह्यात एक ‘हॅण्डवॉश स्टेशन’ विकसित केले आहे. या प्रयोगाचा दाखला देत शिक्षण विभागाने आता राज्यातील सर्व शाळांत अशी स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे.या उपक्रमासाठी प्रत्येक शाळेला किमान एक हजार रुपये मिळणार आहेत. (प्रतिनिधी)‘हॅण्डवॉश स्टेशन’ म्हणजे काय? युनिसेफ या संस्थेने कमीत कमी जागेत जास्तीत जास्त विद्यार्थी चांगल्या पद्धतीने हात धुऊ शकतील, अशी एक संकल्पना मांडली असून, त्याला ‘हॅण्डवॉश स्टेशन’ असे म्हटले आहे. अशा स्टेशन्सची शाळांमध्ये उभारणी करावयाची आहे. हात धुण्याच्या सात पायऱ्या ठरविण्यात आल्या आहेत. हात धुण्यासाठी शाळांनी कोणती साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, सर्व विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी किती वेळ लागेल, अशा सर्व बाबींचा विचार करून याबाबतचे निर्देश शासनाने दिले आहेत.
प्रत्येक शाळेत आता ‘हॅण्डवॉश स्टेशन’
By admin | Published: October 23, 2015 3:02 AM