द्वेष पसरवणाऱ्या शक्तींविरोधात लढायचे आहे : फारूख अब्दुल्ला छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात अनेक नेत्यांची जोरदार फटकेबाजी
लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काही शक्तींकडून द्वेष पसरवला जात आहे. देशातील लोकांमध्ये विभागणी केली जात आहे. या शक्ती देशाला कमजोर करणार असून, त्याविरोधात लढायचे आहे. तरच हा भारत मजबूत होऊ शकेल, असे आवाहन जम्मू ॲण्ड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष खासदार डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी मुंबईत बोलताना केले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भुजबळांबद्दल गौरवोद्गार काढले.
आज देशाची अवस्था काय आहे ते बघा. महागाई कुठे पोहोचली आहे. गरीब पिचला जातोय. मुले शिकलेली आहेत, पण नोकरी नाही. देव आणि अल्लाच या संकटातून बाहेर काढू शकतो, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.राजकीय पार्श्वभूमी नसताना एखादी व्यक्ती महापौर होते, विरोधी पक्षनेते, मंत्री, उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचते आणि महाराष्ट्राला दिशा देते, असे उदाहरण म्हणजे छगन भुजबळ, अशा शब्दांत शरद पवारांनी भुजबळांवर कौतुकाचा वर्षाव केला. प्रफुल पटेल यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख बाळासाहेबांचे खरे वारसदार असा केल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
लढाईच्या क्षणाची वाट बघतोय शिवसेनेने अनेक वादळे अंगावर घेतली. मात्र त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी ही वादळे व वादळ निर्माण करणारे शरद पवार सोबत नव्हते. आता हे सगळे सोबत असताना मी लढाईच्या क्षणाची वाट बघतो आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जावे लागते. हिम्मत असेल तर मैदानात या, माझी तयारी आहे, असे आव्हान त्यांनी दिले.
शिवसेनेचे १५ आमदार गेले त्यावेळी ठाकरे यांनी त्यांना परत आणायची जबाबदारी भुजबळांना दिली असती तर ते त्यांना माघारी घेऊन आले असते आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असते. - अजित पवार, राष्ट्रवादी
पुन्हा एकदा लढाई सुरू झाली आहे. यात मशालीबरोबर हात आहे आणि हाताबरोबर घड्याळ आहे. चिंता करू नका. - बाळासाहेब थोरात, काँग्रेस
प्रत्येकाची विचारधारा मान्य करण्याची या देशाची परंपरा आहे. यामुळेच लोकशाही जिवंत राहते. जिथे जिथे आम्ही बोलतोच ते योग्य तिथे लोकशाही कशी असू शकेल ? जावेद अख्तर, गीतकार
भुजबळ झाले भावनिक आम्ही खूप कष्ट घेतले. सकाळी तीन वाजता मार्केटमध्ये जायचो, भाजी विकायचो. लोक बोलतात एवढी संपत्ती कुठून आली, अरे लहानपणापासून मेहनत केली आहे, अशा आठवणींना भुजबळांनी यावेळी उजाळा दिला.