श्रीकिशन काळे
सध्या पुण्यात जागतिक घुबड परिषद होत आहे. त्यामध्ये जगभरातील 16 देशातील संशोधक शोधनिबंध मांडत आहेत. भारतात पहिल्यांदाच ही परिषद होत असून, त्याचा मान पुण्याला मिळाला आहे. घुबड ही प्रजाती टिकविण्यासाठी ही परिषद महत्त्वाची असून, त्यानिमित्त इला फांउडेशनचे संस्थापक आणि परिषदेचे संयोजक डॉ. सतीश पांडे यांच्याशी साधलेला संवाद.
घुबडाविषयावरील ही परिषद महत्त्वाची का ?
घुबड निशाचर पक्षी असून, तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतातील उंदीर, घूस आदींना फस्त करतो. अंधश्रध्देपोटी त्याचा बळी दिला जातो. त्यामुळे देशात आज दरवर्षी 78 हजार घुबडांची हत्या होत आहे. हे थांबविणे आवश्यक असून, जनजागृती करणे हाच उपाय आहे. त्यासाठी ही परिषद महत्त्वाची आहे. त्यात जगातील 16 संशोधक आपले शोधनिबंध सादर करीत आहेत.
नागरिकांमध्ये घबुडांबाबत काय अज्ञान आहे ?
खरंतर 50 टक्के नागरिकांना घुबडाविषयी काहीच माहिती नाही. आम्ही इला फांउडेशनतर्फे गेल्या महिन्यात सर्व्हे केला होता. त्यामध्ये 50 टक्के जणांना घुबडाविषयी योग्य माहिती नव्हती. तर 20 टक्के जणांना काहीच माहिती नव्हती. इतर 30 टक्के जणांमध्ये मिश्र भावना दिसून आल्या. त्यामुळे आजही घुबडांविषयी अज्ञान दिसते.
घुबड मित्र की शत्रू ?
आपला देश शेतकरी प्रधान आहे. घुबड हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतीसाठी पूरक आहे. तो शेताचे नासधूस करणारे उंदीर, घूस इतर प्राण्यांना खातो. त्यामुळे हा खरा शेतकरी मित्र आहे. परंतु, काही अंधश्रध्दांमुळे लोक घुबडाकडे दुर्लक्ष करतात.
भारतात किती प्रकारच्या प्रजाती आहेत ?
जगभरात घुबडांच्या दोनशेहून अधिक जाती दिसून येतात. भारतात सुमारे 35 प्रकारची घुबडे वास्तव्यास आहेत. यातील पन्नास टक्के घुबड महाराष्ट्रात आढळतात. त्यामुळे त्यांच्यावर अजून संशोधन व्हायला हवे. ते जैवविविधतेसाठी आवश्यक आहेत. पुण्यात पर्वती, रानडे इन्स्टिट्यूट, जुन्या इमारतीमध्ये घुबड पाहायला मिळतात.
घुबड खरंच अशुभ आहे का ?
काही राज्यांमध्ये घुबड हे महालक्ष्मी वाहन असल्याचे मानले जाते. नवरात्रात, तसेच देवीच्या पूजेच्या वेळी घुबडाची पूजा करण्याचीही परंपरा आहे. पण, महाराष्ट्रासह काही राज्यांत घुबडाला अशुभ पक्षी म्हणतात, त्याच्याशी अनेक आख्यायिकाही जोडलेल्या आहेत. त्यामुळे त्याचे दर्शनही घेण्यास लोक इच्छुक नसतात. काळ्या जादूसाठी घुबडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. घुबडाच्या विविध अवयवांचा वापर काळ्या जादूसाठी केला जातो. घुबडांविषयी खूप अंधश्रध्दा आहेत. त्या खोट्या असून, घुबड अशुभ नाही.
घुबडांची प्रजाती संकटात आहे का ?
वेगवेगळ्या प्रकारच्या घुबडांची तस्करी करणारे मोठे जाळे महाराष्ट्रातही सक्रिय आहे. झाडांच्या ढोलीवर नजर ठेवून लोक रात्रीच्या वेळी घुबडांची पिल्ले पळवतात. आत्तापर्यंत घुबडांची चोरी होती, हेदेखील अनेकांना माहिती नव्हते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही घुबडांच्या तस्करांचे जाळे पसरलेले आहे. औषधांसाठी त्याचा वापर करण्यासाठी घुबडांची हत्या केली जाते. त्यामुळे हे थांबविणे गरजेचे आहे.
अधिवास धोक्यात आलाय का ?
वेगाने नष्ट होत असलेली माळराने, गवताळ प्रदेश, गावालगतच्या रिकाम्या जागांवर मानवी अतिक्रमण वाढत आहे. गावाच्या वेशीवर ढोली असलेली मोठ्या झाडांची कत्तल होत आहे, त्यामुळे घुबडांचा अधिवास धोक्यात आला आहे.