अविनाश बाड -आटपाडी -ज्या डाळिंबाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना लखपती बनण्याचे स्वप्न दाखविले, त्या डाळिंबाने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. निर्यातीत घट, थंडीच्या कडाक्याने मागणी कमी असल्याचे दाखवून व्यापारी निम्म्या दराने डाळिंबाची खरेदी करीत आहेत. हे कमी म्हणून की काय ‘अनारदाना’ करणाऱ्या उद्योगांवर अन्न आणि औषध प्रशासनाने छापे मारून ते उद्योग बंद पाडले. त्यामुळे नुसत्या आटपाडीत दरदिवशी हजाराहून अधिक क्रेट डाळिंबे शेतकऱ्यांना अक्षरश: फेकून द्यावी लागत आहेत. आटपाडी तालुक्यात सुमारे १० हजार एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड आहे. गणेश आणि भगवा वाणाची दर्जेदार डाळिंबे निर्माण करण्यासाठी तालुक्याची खास ओळख आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर रविवारी, मंगळवारी आणि गुरुवारी उघड लिलाव पद्धतीने डाळिंबाचे सौदे होतात. त्यासाठी १८ अडत व्यापारी आहेत. (पान ८ वर)कोट्यवधींचे नुकसान; शासनाचे दुर्लक्ष!फळे आणि भाजीपाला यासाठी शासनाने आधारभूत किंमत ठरवली नसल्याने, व्यापाऱ्यांनी कमी दराने डाळिंबे खरेदी केली तर, त्यावर काही कारवाई करता येत नाही. अनारदाना बनविण्यासाठी डाळिंबाची खरेदी बंद झाल्याने बाजार समितीच्या आवारातील टाकून दिलेली डाळिंबे मजूर लावून ट्रॅक्टरने भरून नेऊन वाळल्यावर पेटवून देऊन नष्ट करणे हे मोठे खर्चिक आणि न परवडणारे काम झाले आहे.- एस. यू. जाधव, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडीडाळिंबाला आधारभूत किंमत नाही. त्यामुळे रक्ताचं पाणी करून शेतकऱ्यांनी निर्माण केलेली गुणवत्तापूर्ण डाळिंबे सध्या मातीमोल किमतीने व्यापारी खरेदी करीत आहेत. नडलेला शेतकरी मिळेल त्या दराने डाळिंब विकत आहे. दरात वाढ झाली नाही, तर महागडी कीडनाशके, बुरशीनाशके, रासायनिक खते यावर झालेला खर्चही निघणे कठीण आहे. याकडे शासनाचे आणि एरवी शेतकऱ्यांच्या नावाने गळा काढून शेतकऱ्यांचे कै वारी असल्याचा आव आणणाऱ्या पुढाऱ्यांचेही दुर्लक्ष आहे.
रोज हजारांवर क्रेट डाळिंब कचऱ्यात
By admin | Published: January 05, 2015 12:52 AM