मुंबई : कालचा मोठा भाऊ आज लहान कसा होतो. लहान भाऊ, मोठा भाऊ हा प्रकार शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना कालही बाप होता, आजही बापच आहे. बापासमोर झुकावंच लागतं, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यावेळी भाजपावर हल्ला चढविला.पोस्टरबाजीचा संदर्भ घेत राऊत यांनी भाजपाकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर टीका केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोणत्याही पदावर नव्हते, तर आधार होते. म्हणूनच ५० वषार्पासून त्यांच्यासमोर झुकण्याची परंपरा आहे. काल मुख्यमंत्री होतात. आज पंतप्रधान पदावर आहात; म्हणून मान मिळतोय. आज दिल्लीत लालकृष्ण आडवाणींची काय अवस्था झाली आहे, ते पहा, पण आजही ते आम्हाला वंदनीय आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली.शिवसेना आता थेट पाकिस्तानला अंगावर घेत आहे. म्हणून काळ्या आॅईल पेंटचा डबादेखिल शस्त्र बनतो. केंद्रात राज्यात सत्ता असतानाही पाकिस्तानी नेत्यांसाठी पायघड्या घातल्या जात आहेत. उलट शिवसैनिकांच्या विरोधात पोलिसांच्या लाठ्य वापरल्या जात असल्याची टीका राऊत यांनी केली. सेल्फीचे वेड आणि शेतकऱ्यांना मदतशिवाजी पार्कवर सेल्फीचे वेड दिसले. राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन, माँ साहेबांच्या पुतळ्याजवळ, रावण दहनासाठी उभारलेल्या पुतळ्यासमोर सेल्फी काढले. स्टॉल्सवर बाळासाहेबांचे फोटो, भाषणांच्या सीडी खरेदीसाठी गर्दी होती. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील कामांचा आढावा घेणारी चित्रफीत सभास्थानी दाखविण्यात आली. मात्र, या ध्वनीफीतीत केंद्रातील व राज्यातील सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांची कामे दिसली नाहीत. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना पक्षाच्या वतीने केलेली मदत, महापालिका शाळांतील टॅब, प्रायोगिक तत्त्वावर हवेतील बाष्पातून पाणी, आदिवासी पाड्यात केलेली कामेच यात दाखविण्यात आली.मागील दसरा मेळाव्यात शिवसैनिकांच्या रोषामुळे शिवसेना नेते मनोहर जोशींना अपमानित होवून व्यासपीठावरून पायउतार व्हावे लागले होते. यंदाच्या मेळाव्यात अन्य नेत्यांसह जोशी व्यासपीठावर आले. आदित्य ठाकरेंच्या शेजारी त्यांचे स्थान होते.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हारतुऱ्याना फाटा देण्यात आला. त्याऐवजी स्थानिक विभाग, चित्रपट सेना, कामगार सेना, लोकाधिकार समितीच्यावतीने दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधीचे धनादेश उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द करण्यात आले.भलेमोठे डॉल्बी स्पीकर व कर्णे यांची जागा छोट्या स्पीकर्सनी घेतली होती. आवाजाची मर्यादा पाळण्याचे न्यायालयाचे निर्देश पाळण्यात आले. छोट्या स्पीकरमुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या सुरुवातीला आवज येत नसल्याची तक्रार केली.
बापापुढे सर्वांना झुकावेच लागते!
By admin | Published: October 23, 2015 2:17 AM