'स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण...', नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्वाकांक्षेवर अजित पवारांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 01:03 PM2021-06-14T13:03:05+5:302021-06-14T13:03:36+5:30
Ajit Pawar: राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोल्हापुरातील पॉझिटिव्हिटी रेट मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही.
Ajit Pawar: राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोल्हापुरातील पॉझिटिव्हिटी रेट मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोल्हापूर दौरा करुन तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अजित पवार यांनी कोरोना संदर्भातील नियमांचं कडक पद्धतीनं पालन होईल याची काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यासोबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांवर दिलखुलासपणे उत्तरं दिली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाबाबतची महत्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. तसेच काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचीही घोषणा पटोलेंनी केली. याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी रोखठोक विधान केलं. "नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आपला पक्ष वाढावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली असेल तर स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. उद्या तुम्हालाही रिपोर्टरपदावरुन चिफ एडिटर केलं तर आवडणार नाही का? प्रत्येकाल महत्वाकांक्षा असते. पण शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून जे व्यक्ती आहेत. ते निर्णय घेत असतात. आता कोणत्या पक्षाशी आघाडी करायची की स्वबळावर लढायचं हा अधिकारा काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना आहे. राष्ट्रवादीत शरद पवार आणि शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे आम्ही यावर मत व्यक्त करणं योग्य नाही", असं अजित पवार म्हणाले.
कोल्हापुरकरांना दिला कडक इशारा
कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी नागरिकांना कडक इशारा दिला आहे. नियमांचं पालन केलं जात नसेल तर कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल करणार नाही. नियमांमध्ये आणखी कडक धोरण अवलंबावं लागेल, असा रोखठोक इशारा यावेळी अजित पवार यांनी कोल्हापुरकरांना दिला आहे.
कोल्हापुरात ज्या ज्या ठिकाणी लसीकरणाचं प्रमाण अधिक आहे. तिथं कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर शासनाचा भर आहे. यासोबत संस्थात्कक विलगीकरण वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेवटी लसीकरण वाढवूनच कोरोनावर मात करणं शक्य आहे, असं अजित पवार म्हणाले.