ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - गोरक्षकांच्या नावे नरभक्षक बनू नका, बीफ खाण्याचा अधिकार सर्वांना आहे, असे खडे बोल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कथित गोरक्षकांना सुनावले आहेत.
देशात गोमांस किंवा जनावरांची वाहतूक केल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांकडून झालेल्या मारहाणीत अनेकांनी आपल्या जीव गमवावा लागला आहे. यावर बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की, बीफ खाण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यामुळे गोरक्षकांच्या नावे नरभक्षक बनू नका. तसेच, गोरक्षकाच्या नावाखाली कोणालाही मरेस्तोवर मारहाण करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे करणाऱ्या गोरक्षकांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले.
देशभरात कथित गोरक्षकांकडून अनेकांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली होती. असे प्रकार यापुढे सहन करणार नाही, असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. मात्र, त्यानंतरही मारहाणीच्या घटना थांबल्या नाहीत. या घटनांवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनीही चिंता व्यक्त केली आहे. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा घडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तुम्हाला पोलिसांकडे जाण्याचा अधिकार आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
जनावरांची वाहतूक आणि गोमांस बाळगल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांकडून मारहाणीत अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या घटनांमध्ये वाढ होत आहे. यावरून देशातील राजकारणही तापले आहे. विरोधकांकडून सातत्याने नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले जात आहे. या घटनांना सत्ताधारी भाजप कारणीभूत असल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून केला जात आहे.