पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना ''आम्ही तुमचे बाप आहोत असे म्हणाले होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी “चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढण्याची भाषा सारखी करत आहात ” असा प्रतिहल्ला चढवला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी आपल्या ट्विटरवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या दोन निवडणुकांमध्ये दिल्लीत कुणाचा बाप बसला आहे हे सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि त्यांच्या वारसदारांची काळजी तुम्ही करू नये. विचारांनी सरळमार्गी असणाऱ्या लोकांचे अनेक वैचारिक वारसदार असतात. आणि तुमच्यासारख्या दृष्ट प्रवृत्तींना शह देण्यासाठी ते सदैव तत्पर राहतात. याप्रकारे पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे.
“ शेतकरी, कामगार आणि कष्टकरी जनतेला आम्ही आमचे मायबाप समजतो. त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत. आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच त्यांची जर कोणी फसवणूक करणार असेल तर त्यांच्या फायद्यासाठी असणाऱ्या विधेयकाला विरोध करत असेल तर आम्ही सदैव संघर्ष करणार आहोत असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीने 'या' शब्दात दिले होते चंद्रकांत पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर.... राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे म्हणाले होते , ''चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषासारखे करत आहात. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने आणलेले विधेयके हे शेतकरी आणि कामगार यांच्यावर अन्याय करणारे आहेत. हे विधेयके त्यांच्या हिताचे नाही. जर ते शेतकरी व कामगारांच्या फायद्याचे असते तर आम्ही आनंदाने त्या विधेयकांचे समर्थन केले असते. परंतु, हे विधेयके कामगारांवर अन्याय करणारे असून फक्त मालक धार्जिणे आहेत. मोदी सरकारचे उद्योगपतींसाठी बाजारपेठ उभी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. राज्यात भाजपाची आंदोलने चालू आहेत याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे?
.....
पुढील काही दिवस तरी हे वाकयुद्ध असेच सुरूच राहणार
भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मधील वाद संपुष्टात येण्याची काही चिन्हे दिसत नाही.दोन्ही बाजूने जोरदार शाब्दिक हल्ले एकमेकांवर चढवले जात आहे. त्या हल्ल्याची पातळी आता एकमेकांचे बाप काढण्यावर येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडताना मोदींवरच निशाणा साधला होता. आता पाटलांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर कडक शब्दात पलटवार केला आहे. दोन्ही पक्षांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार नसल्याने पुढील काही दिवस तरी हे वाकयुद्ध असेच सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.