मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात पुन्हा एकदा आंदोलन पेटले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. विशेषत: बीड जिल्ह्यात आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आल्याने त्याची गंभीर दखल गृह विभागाला घ्यावी लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांना सक्त इशारा दिला आहे. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. मात्र हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही, असं गृहमंत्र्यांनी बजावलं आहे.
मराठा आरक्षण आंदोलनात झालेल्या हिंसाचाराबाबत प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत राज्य सरकार सकारात्मकतेने पावलं उचलत आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत आश्वासन दिलं आहे. त्यानुसार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत बांधिल आहे. त्याबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करताहेत. विशेषकरून ज्याप्रकारे काल बीडमध्ये काही लोकांनी लोकप्रतिनिधींची घरं जाळली. काही विशिष्ट्य समाजाच्या लोकांना टार्गेट कर. हॉटेल, दवाखाने जाळ, प्रतिष्ठान जाळ, अशा प्रकारची कृत्यं केली आहेत.
हे प्रकार अत्यंत चुकीचे आहेत. त्याची अतिशय गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. अशा सर्व लोकांवर पोलीस आणि गृह विभाग कडक कारवाई करेल. विशेष करून लोक घरात असताना घरं जाळण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, त्याचे सर्व व्हिडीओ फुटेज मिळालेले आहेत. त्यामधून ५०-५५ लोकांची ओळख पटली आहे. उर्वरित लोकांची ओळख पटवली जात आहे. या सर्व लोकांना पोलीस जीवे मारण्याचा प्रयत्न ३०७ कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, अशी सक्त ताकीद देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
अशा प्रकारे कुणाला मारून टाकण्याचा प्रयत्न, कुणाची मालमत्ता जाळण्याचा प्रयत्न असले प्रकार होत असतील, तिथे पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाहीत. कडक कारवाई करण्यात येईल. जिथे शांततापूर्ण आंदोलनं सुरू असतील तिथे कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. मात्र हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही. अशी परिस्थिती असलेल्या ठिकाणी सुरक्षेसाठी अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. असे प्रकार करणाऱ्यांना जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तसेच ज्यावेळेस अशा घटना समोर होत्या. त्यावेळी काही राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते त्यात सहभागी असल्याचे दिसून येतेय. त्याबाबतच्या व्हिडीओ फुटेजची तपासणी केल्यानंतर त्याची माहितीही तुम्हाला देण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.