नांदेड - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘नीट’ परीक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यात भवितव्याबाबत संभ्रम आणि अनिश्चितता आहे. त्यामुळे ते मानसिक तणावात असून, अनेकांनी मानसोपचारतज्ज्ञांकडे धाव घेतली आहे. विशेष म्हणजे कोचिंग क्लास चालकांनीही मानसोपचारतज्ज्ञांकडे अशा परिस्थितीत काय करावे? याबाबत सल्ला मागितला आहे.
सोशल मीडियावर ‘नीट’ची लखनौ येथील विद्यार्थिनी आयुषी पटेल हिचा मन सुन्न करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एनटीएच्या गोंधळामुळे ही मुलगी तणावात गेली असून, सोशल मीडियावर मदतीची भीक मागत आहे. नांदेडातही हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सर्वोच्च न्यायालयातही ‘नीट’बाबत कोणताच निर्णय अद्याप घेण्यात आला नाही.
कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा व्हावी, असे वाटते, तर चांगले मार्क मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा झाल्यास आपल्याला चांगले गुण मिळतील काय? अशी चिंता सतावत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक तणावात आले आहेत.
मानसोपचाराचा सल्लासततची बेचैनी, थरथर, झोप न लागणे, भूक कमी होणे, डोक्यात तोच तो विचार, ही विद्यार्थ्यांच्या तणावाची लक्षणे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कोचिंग क्लासेस चालक हे देखील मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.
विद्यार्थी आणि पालकांनी अशा नाजूक समयी संयम ठेवणे गरजेचे आहे. स्वत:वर विश्वास ठेवावा. कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये. घडत असलेल्या प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष द्यावे आणि काही निर्णय आल्यास न डगमगता योग्य तो निर्णय जास्त काळ गोंधळात न राहता घ्यावा. - डॉ. रामेश्वर बोले, मानसोपचार तज्ज्ञ