मुंबई : सरकारने कितीही कारवाई केली तरी, नागरिकांनी स्वत:हून तंबाखूचा त्याग करणे आवश्यक आहे. आणि असे होईल तेव्हाच राज्य तंबाखूमुक्त होईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. संपूर्ण राज्य तंबाखूमुक्त होत नाही; तोवर राज्यात तंबाखूमुक्त मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.सलाम मुंबई फाउंडेशन, नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन यांच्या वतीने नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये तंबाखू नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेसह व्यक्तींच्या कामास पाठिंबा देण्यास आणित्यांच्या कार्याच्या गौरवाकरिताआयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या.सुप्रिया म्हणाल्या, तंबाखूसेवनाच्या घातक परिणामाची जाणीव करून देणाऱ्या जाहिराती सर्वत्र दिसून येतात. तरीदेखील राज्य तंबाखूमुक्त होताना दिसून येत नाही. यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वत: पुढाकार घेऊन तंबाखू खाणे आणि खाण्यापासून रोखले, तरच राज्यात तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होईल.प्रतापगढमधील तरुण चेतना, छत्तीसगढमधील जनस्वास्थ सहयोग, मध्य प्रदेशातील सटाणा दीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि जालना निर्माण विकास संस्था या स्वयंसेवी संस्थांचा या वेळी गौरव करण्यात आला. तसेच धुळे येथील डॉ. सतीश पाटील, सांगली येथील लक्ष्मण शिंदे, मुंबईतील वर्षा विद्या विलास, रत्नागिरीमधील सिद्धेश्वर ढोके, कोल्हापूरमधील संजय मोहिते, अमरावतीमधील सुरेश रहाटे, यवतमाळ येथील चंद्राबोधी घायवटे, अवधूत वानखेडे, नंदुरबार येथील मल्लिनाथ कलशेट्टी यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता अंकित मोहन उपस्थित होते.
तंबाखूमुक्तीसाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक - सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 2:06 AM