खडकवासला : ‘‘शहराला पिण्यासाठी व हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील गावांना पिण्यासाठी, शेती, कारखानदारीला पाणी देण्यासाठी त्या त्या काळी चार धरणे बांधली. परंतु वाढत्या लोकसंख्यमुळे या धरणांतील सर्वात जास्त पाणी पुणे शहराला द्यावे लागत आहे. त्यानंतर, उर्वरित पाणी तालुक्यातील गावांना व शेतीला द्यावे लागते. त्यामुळे आता पुणेकर आणि शेतकऱ्यांनी पाणी जपूनच वापरले पाहिजे,’’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. खडकवासला परिसरात ग्रीन थंब संस्थेकडून महात्मा फुले पाणी चळवळ अभियानांतर्गत धरणातील गाळ काढण्याच्या प्रकल्पाला शरद पवार यांनी रविवारी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ग्रीन थंब संस्थेचे कर्नल सुरेश पाटील, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अंकुश काकडे, जालिंंधर कामठे, कुमार गोसावी, रवींद्र माळवदकर, हेमंत रासने, विकास दांगट, नवनाथ पारगे, नितीन दांगट, किसन जोरी, काका चव्हाण, कैलास खिरीड, आनंद मते, प्रवीण शिंंदे उपस्थित होते. पवार म्हणाले, भोर, वेल्हे, मुळशी व हवेली या मावळी तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. पूर्वी लाकूडफाटा कोळशा यासाठी जंगल तोडले. सह्याद्रीचे डोंगर बोडके झाले. परिणामी पावसाबरोबर मोठ्या प्रमाणात माती वाहून येते येऊन धरणे गाळाने भरली गेली. कोयना धरणात परिसरात जंगल जास्त असल्याने त्या धरणात सर्वात कमी गाळ आहे, असेही पवार यांनी सांगितले.व्हिएतनामप्रमाणे धरणसाठ्यात माशांचे पिंंजरे टाकून ‘केज फार्मिंग’ (मत्स्यशेती) करावे. मोठे लोखंडी पिंंजरे तयार करावे. त्यात मत्स्यबीज टाकून ते पिंंजरे मग पाण्यात सोडायचे. त्यांना नियमित खाद्य टाकले, की नऊ महिन्यांत मासा एक किलोचा होतो. त्या देशात हा मोठा व्यवसाय आहे. ही योजना दक्षिणेतील राज्यात सुरू असून, ते दरवर्षी १६ हजार कोंटीचे मासे निर्यात करतात. कोयना धरणात व रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे प्रकल्प राबविला आहे. कर्नल पाटील म्हणाले, सध्या जलयुक्त शिवारचा गाजावाजा होत आहे. परंतु यामध्ये मोठ्या त्रुटी आहेत. पैसा वाया गेला आहे.
सर्वांनी पाणी जपूनच वापरावे : शरद पवार
By admin | Published: May 16, 2016 1:11 AM