मुंबई - राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरूनही अंहकार आणि अतिआत्मविश्वासाने ओतप्रोत झालेला भारतीय जनता पक्ष आज विरोधी पक्षाच्या बाकावर बसला आहे. सध्याच्या स्थितीवरून राजकारणात एक पाऊल मागे घेऊन मोठी उडी घेण्याचं कसब असावं लागतं हे राज्यातील भाजप नेतृत्वही विसरलं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र भाजपला अतिआत्मविश्वासच नडल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोधी पक्षातील नेत्यांची पक्षाच्या स्थितीवरून टर उडवलेली आहे. यामध्ये फडणवीसांसह तत्कालीन शिक्षणमंत्री देखील आघाडीवर होते. सत्तेत असताना विनोद तावडे यांनी केलेले वक्तव्य आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
सभागृहात चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि तावडे यांच्यात एका मुद्दावरून जुगलबंदी रंगली होती. सभागृह अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आक्रमक झालेल्या आव्हाडांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तावडे म्हणाले होते की, बोलू द्या त्यांना, या सभागृहात ते पुन्हा येतील की नाही, हे सांगता येत नाही. त्यावेळी संतप्त झालेल्या आव्हाडांनी तावडेंना आपल्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचे आव्हानच दिले होते. नंतर हे प्रकरणी मिटले. तर आव्हाडांनी मंत्र्यांना आव्हान दिल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली होती.
आता तावडे अशाच वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. आव्हाड सभागृहात दिसतील की नाही, असा प्रश्न उपस्थित करणारे तावडेच आज सभागृहात नाही. त्यांना भाजपकडून तिकीट देताना डावलण्यात आले आहे. फडणवीस यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. राज्यात विरोधीपक्षनेता आणि विरोधीपक्षच अस्तित्वात राहणार नाही, असं ते म्हणाले होते. मात्र दुर्दैवाने त्यांनाच विरोधीपक्ष नेतेपदाच्या बाकावर बसावे लागले असून ते विरोधकांची भूमिका बजावत आहे.