पिंपरी : दृष्टी तशी सृष्टी दिसते. विरोधी पक्षाच्या नजरेला कावीळ झाली असून त्यांना सगळंच पिवळं दिसत आहे. प्रत्येक गोष्ट राजकीय दृष्टीकोनातून बघितली जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्पावर त्यांच्याकडून राजकीय अभिनिवेशातून टीका होत आहे. कोरोनाच्या संकटकाळानंतर सर्व घटकांना सामावून घेणारा आणि देशवासीयांचा आत्मविश्वास वाढविणारा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. प्राधान्यक्रम नजरेसमोर ठेवून अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केला आहे, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.
प्रवीण दरेकर यांनी सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांच्या टिकेला उत्तर दिले. या वेळी दरेकर म्हणाले, अर्थसंकल्पातून चार राज्यांना दिलेले पैसे विरोधकांना दिसताहेत. अनुषेश असलेल्या राज्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. परंतु या चार राज्यांकडे बोट दाखवत असताना नागपूर मेट्रोसाठी पाच हजार ९०० कोटी रुपये दिले. नाशिक मेट्रोसाठी दोन हजार ९० कोटींपर्यंत तरतूद केली आहे. मुंबई-दिल्ली तसेच मुंबई-कन्याकुमारी रस्त्यासाठी तरतूद आहे. स्वप्नातही कधी पाहिली नव्हती अशी तरतूद राज्यासाठी आहे. शेतीमालाच्या दीडपट हमीभावासाठी तरतूद आहे. कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी १६ लाख ५० हजार कोटींची तरतूद आहे. लसीसाठी ३५ हजार कोटी असून, आरोग्य व्यवस्थेसाठी दोन लाख ३८ हजार कोटींपर्यंत तरतूद आहे. पेन्शनवर कर आकारण्यात येणार नाही, स्टार्टअपसाठी पहिल्या एक वर्षासाठी कर लावण्यात येणार नाही, कृषी सिंचन, इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते उभारणी आदीसाठी अर्थसंकल्पात तरतूद आहे.