मुंबई - महाराष्ट्राने अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा पावसामुळे रद्द झालेल्या पाहिल्यात. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना औरंगाबाद येथील सभा आटपून त्यांना नागपूर येथील सभेला संबोधीत करायचे होते. परंतु, मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे त्यांनी सभा रद्द केली होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्यात मुसळधार पावसात घेतलेल्या सभेमुळे सोशल मीडियावर वातावरण पवारमय झालेले दिसत आहेत.
राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते सोडून गेल्यामुळे कमकुवत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार यांनी पुन्हा एकदा ट्रॅकवर आणले. एवढच नाही तर राज्यात काढलेल्या दौऱ्यातून अनेकांना आपलस केलं. त्यातच ईडीने गुन्हा दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे पवाराविषयी आणखीच आकर्षण निर्माण झाले. एकंदरीत पवारांचा झंझावात निर्माण झाला होता.
ईडीच्या नोटीसनंतर पवारांनी महाराष्ट्रच हदरून टाकला होता. युवक मोठ्या प्रमाणात पवारांच्या सभांना गर्दी करू लगाले. एरवी केवळ सोशल मीडियावर एक्टीव्ह राहणाऱ्या तरुणांना पवारांविषयी आदर निर्माण झाला. हे घडत असताना पवारांनी साताऱ्यात छत्रपती उदयनराजे यांच्या विरुद्ध घेतलेली सभा चर्चेचा विषय ठरत आहे. पाय सुजलेले असताना पवारांनी मुसळधार पडणाऱ्या पावसातही आपले भाषण थांबले नाही. तर सभेला जमलेले श्रोतेही जागचे हालले नव्हते.
या सभेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, फेसबुकवरील प्रत्येक तिसरी पोस्ट पवारांविषयी दिसत आहे. सोशल मीडियावर पवारांचा झंझावात असून विरोधक कुठही दिसत नसल्याची स्थिती आहे.