शपथविधीनंतरच्या २ बैठकीत शरद पवारांनी गाफील ठेवलं; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 02:12 PM2023-12-01T14:12:17+5:302023-12-01T14:17:28+5:30

१२ ऑगस्टला मला एका उद्योगपतीनं पुण्यात जेवायला बोलवले. तिथे मला सांगितले. वरिष्ठांशी चर्चा झाली. तिथे जयंत पाटील येतील, तुम्ही असाल आणि मी असेल असा निरोप आला.

Everything was going to be restored in NCP, Sharad Pawar ignored it, Ajit Pawar's allegation | शपथविधीनंतरच्या २ बैठकीत शरद पवारांनी गाफील ठेवलं; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

शपथविधीनंतरच्या २ बैठकीत शरद पवारांनी गाफील ठेवलं; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

कर्जत - अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवारांसह मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटरला शरद पवारांच्या भेटीला गेले होते. त्याभेटीबाबत पहिल्यांदाच अजितदादांना मोठा गौप्यस्फोट केला आहे. आम्हाला सातत्याने गाफील ठेवण्यात आले. प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यापासून काही प्रमुखांना या गोष्टी माहिती आहे असं अजित पवारांनी म्हटलं आहे. 

कर्जतला पक्षाच्या चिंतन शिबिरात अजित पवारांनी शरद पवारांसोबतच्या भेटीबाबत खुलासा केला. अजित पवार म्हणाले की, पटेल, तटकरे, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, रामराजे निंबाळकर, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे असे १०-१२ जण देवगिरीला बसलो होतो. पुढे काय करायचे यावर चर्चा सुरू होती. शरद पवारांना थेट कसं सांगायचे म्हणून आम्ही सुप्रियाला माझ्या घरी बोलावून घेतले.लोकशाहीत बहुमताला आदर द्यावा लागतो. तेव्हा तिने मला ७ ते १० दिवस द्या, मी साहेबांना समजावते असं म्हटलं. आम्ही दहा दिवस थांबलो. जयंत पाटील, अनिल देशमुखही होते. सरकारमध्ये गेले पाहिजे. आमदारांच्या मतदारसंघात विकास थांबलाय, कामांना स्थगिती दिलीय. त्यानंतर आम्ही थेट साहेबांकडे गेलो. त्यांनी सर्व ऐकले आणि बघू असं म्हटलं. 

तसेच वेळ जात होता, एकदा काय तो निर्णय घ्यायचा तो घ्या हे आम्ही सातत्याने सांगत होतो. १ मेच्या आधी तुम्ही सरकारमध्ये जा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो असं मला सांगितले. त्यानंतर २ मे रोजी केवळ घरातील चौघांना शरद पवार राजीनामा देणार हे माहिती होते. त्यानंतर राजीनामा दिला. सगळेच आश्चर्य चकीत झाले.त्यानंतर वेगळे वातावरण तयार केले. वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांना बोलावून घेतले त्यानंतर उद्यापासून यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर काही लोक आंदोलनाला बसवा असं सांगितले. राजीनामा परत घ्या,परत घ्या बोलायला सांगितले. जर राजीनामा द्यायचा नव्हता मग दिला कशाला? तिथे जितेंद्र सोडला तर एकही आमदार नव्हता. मला एक सांगतायेत, इतरांना दुसरं सांगत होते असा आरोप अजित पवारांनी केला. 

दरम्यान, सुप्रिया सुळेला राष्ट्रीय अध्यक्ष करा याची सर्वांनी तयारी दाखवली होती. धरसोड वृत्तीनं आम्हाला गाफील ठेवले गेले. एक घाव दोन तुकडे करायचे.२ जुलैला आम्ही शपथ घेतली. ३० जूनला कार्यकारणी झाली होती. त्यात सगळे होते. २ जुलैला घेतलेला निर्णय आवडलेला नव्हता मग १७ जुलैला आम्हा सर्व मंत्र्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला बोलावले. जर निर्णय आवडला नव्हता तर बोलावले कशाला? आधी मंत्री या, नंतर आमदार या. आमदार घाबरत असताना मी सगळ्यांना नेले. चहापाणी झाले. तिसऱ्या दिवशी ७-८ जणांशी चर्चा करून सर्व सुरळीत होणार होते. या सगळ्यात वेळ गेला. आम्हाला पुढे जायचे आहे ते आम्ही म्हणत होतो. सगळं पूर्ववत करायचे असा निरोप यायचे. याचा अर्थ तुम्ही आम्हाला गाफील ठेवता का? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला. 

उद्योगपतीच्या घरी बैठकीला बोलावलं....

१२ ऑगस्टला मला एका उद्योगपतीनं पुण्यात जेवायला बोलवले. तिथे मला सांगितले. वरिष्ठांशी चर्चा झाली. तिथे जयंत पाटील येतील, तुम्ही असाल आणि मी असेल असा निरोप आला. दुपारी जेवायचे ठरले. निरोप आल्यानंतर मी गेलो. जुलैला झाले त्यानंतर ऑगस्ट आले.दीड महिना झाले जर तुम्हाला करायचे नव्हते तर गाफील कशाला ठेवायचे. आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच लोकांची कामे करतोय. आम्ही चांगल्याप्रकारे सरकार चालवू शकत नाही. कोरोना काळात कोण काम करत होते हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. नवीन पिढीसाठी पुढील १०-१५ वर्ष महत्त्वाचे होते. त्यामुळे आपल्याला पुढे जायचे आहे असंही अजित पवारांनी सांगितले. 
 

Web Title: Everything was going to be restored in NCP, Sharad Pawar ignored it, Ajit Pawar's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.