मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते संजय राऊत मागील काही दिवसांपासून एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. यातच, राऊतांनी चंद्रकांत पाटलांना नागालँडचे राज्यपालपद मिळू शकते, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटलांनी राऊत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, असा टोला लगावला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष असताना सर्वकाही सुरळीत होतं, असा चिमटा काढला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केली. 'मुख्यमंत्र्यांनी रावसाहेब दानवेंना भेटायला बोलावलं आहे, ते केंद्रीय मंत्री आहेत, मीही त्यांना अनेकदा भेटतो. दानवे हे अजातशत्रू आहेत, ते सर्वांचे मित्रं आहेत. दानवे जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष होते. तेव्हा सर्व काही सुरळीत सुरू होतं', असं राऊत म्हणाले.
दोन दिवसांपैकी एक दिवस झालाराऊत पुढे म्हणाले, 'चंद्रकांत पाटलांनी दोन दिवसांत बदल होणार असल्याचे संकेत दिले होते. त्या दोन दिवसातील 24 तास संपले, आता 24 तास राहिले आहेत. ते काय भूकंप करतात त्याची वाट पाहू, असं राऊत म्हणाले. तसेच, चंद्रकांत पाटील महाविकास सामिल होऊ शकतात असं मुख्यमंत्र्यांच्या विधानवरून दिसू शकतं. तीन पैकी एका पक्षात ते प्रवेश करू असं पाटील यांना वाटत असेल, म्हणून त्यांना माजी राहणार नाही असं म्हटलं असावं', असा चिमटाही त्यांनी काढला.