लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल :नवी मुंबईपोलिस आयुक्तालयातील पनवेल येथे उभारलेले पुरावा व्यवस्थापन कक्ष हे महाराष्ट्र नव्हे, तर देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पनवेल येथे व्यक्त केला.
पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या आवारातील अद्ययावत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे, तर एनआरआय पोलिस ठाणे व तळोजा पोलिस ठाणे येथील पुरावा व्यवस्थापन कक्षाचे ऑनलाइन प्रणालीद्वारे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलिस खात्यातील कामाचा वाढता ताण व अपुरे मनुष्यबळ यातून मार्ग काढत नवनवीन संकल्पना राबवून परिमंडळ एक व दोन या स्तरावर या प्रकारचे उपक्रम सुरू करण्यात आले असून, यामुळे पोलिसांना फायदा होत असल्याचे सांगितले.
प्रत्येक पोलिस ठाण्याकरिता स्वतंत्र रॅक व मुद्देमालासाठी स्वतंत्र क्यूआर कोड असल्याने मुद्देमाल एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सांगितले. मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांनी या कक्षाची पाहणी केली.
या कार्यक्रमास आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी किसन जावळे, अपर पोलिस आयुक्त दीपक साकोरे, परिमंडळ दोनचे उपायुक्त विवेक पानसरे, परिमंडळ एकचे उपायुक्त पंकज डहाणे आदी उपस्थित होते.
मनुष्यबळाची बचत
गुन्ह्यातील मुद्देमाल हा पोलिस ठाण्यातील मुद्देमाल कक्षामध्ये ठेवला जात असतो; परंतु ठाण्यात पुरेशी जागा नसणे, मुद्देमाल खराब होणे, ओला होणे यासारख्या अनेक समस्यांमुळे मुद्देमाल योग्य पद्धतीने न्यायालयासमक्ष सादर करण्यात अडचणी निर्माण होतात.
हा सर्व मुद्देमाल पोलिस ठाण्यातून स्वतंत्र ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठेवल्यास जागेची, वेळेची व मनुष्यबळाची बचत होऊ शकते. या उद्देशाने नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाची संकल्पना राबविल्याचे फडणवीस यांनी सांगितले.