मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले. परंतु, काही ठिकाणी मत मोजणीत मतांच्या बेरजेत गोंधळ आढळून आला. त्यामुळे निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिनवरील संशय अधिकच वाढला आहे. ईव्हीएमला आधीपासूनच विरोध होत होता. परंतु, आता या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. त्यामुळे या आंदोलनाला धार येण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही जागा लढवली नाही. परंतु, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना विरोध केला. तसेच पुरावे सादर करत भाजपला धारेवर धरले. परंतु, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. भाजपने २०१४ पेक्षा यावेळी मोठे यश मिळवले. त्यामुळे विरोधकांचा हिरमोड झाला. मात्र, भाजपचा विजय हा ईव्हीएममुळेच झाल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधी नारा बुलंद केला. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतल्या.
राज यांनी ईव्हीएमसंदर्भात विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती. राज यांनी परवा घेतलेल्या कार्यक्रमात देखील आपली भूमिका स्पष्ट केले. तसेच मनसे कार्यकर्त्यांना ईव्हीएमविरोधी चळवळ उभी करण्याच्या सूचना केल्या. राज यांच्या या लढ्याला विरोधी पक्षांचा देखील पाठिंबा मिळत आहे.
राज यांच्या पाठिशी मोठमोठी आंदोलने उभारण्याचा अनुभव आहे. राज्यातील टोल वसुली, मराठी पाट्यांचे आंदोलन आणि भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये अधिक प्राधान्य देण्याचा मुद्दा यामुळे राज ठाकरे देशभरात गाजले होते. मराठीच्या मुद्दावर राज यांनी २००९ मध्ये मोठे यश मिळाले होते. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत सर्वच पक्षांची वाताहत झाली. त्यात मनसेची स्थिती काही वेगळी नव्हती.
दरम्यान अपयश विसरून राज ठाकरे पुन्हा एकदा मोठ आंदोलन उभारण्याच्या तयारीला लागले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना नवीन कार्यक्रमही दिला आहे. वास्तविक पाहता, निवडणुकीत ईव्हीएमवर बंदी घालण्यासाठी लोकसभेत कायदा बनवावा लागणार आहे. त्याशिवाय बॅलेट पेपरवर निवडणुका होणे शक्य नाही. तसेच भाजपच लोकसभेतील संख्याबळ पाहता ईव्हीएम बंद होण्याची शक्यता कमीच आहे. तरी देखील राज ठाकरे ईव्हीएमविरोधी जन आंदोलन उभं करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे तीन महिन्यावर आलेली विधानसभा निवडणूक नव्हे तर ईव्हीएमविरोधी आंदोलनच मनसेच्या रडावर दिसत आहे.