संजय माने,पिंपरी- उत्तर प्रदेशसह काही राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वादात सापडलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनबाबत (ईव्हीएम) निवडणूक आयोगाने खुलासा देताना पूर्णपणे सुरक्षित व विश्वासार्ह असल्याचा निर्वाळा दिला. मात्र पुणे परिसरात डमी ईव्हीएम मशिनची खुल्या बाजारात सर्रास विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. एका संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर मशिनचा डेमोही दाखविला जातो.कोणतीही निवडणूक म्हटले की, दक्ष सरकारी यंत्रणा, पोलीस बंदोबस्तात मतदान, उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष यंत्र सील करणे-उघडणे या प्रक्रिया होतात. निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत ही सर्व यंत्रणा अंमलात येते. परंतु ईव्हीएम मशिन केवळ शासकीय यंत्रणाच वापरतात, असा समज असेल तर तो खोटा आहे. कारण पुणे व भोसरी परिसरात ईव्हीएमची विक्री करणारे अनेक वितरक आहेत. सहकारी बँका, पतसंस्था तसेच सहकार क्षेत्रातील अन्य संस्थांना मतदान घ्यायचे असेल, तर ते ईव्हीमएम मशिनवर घेता येते, असा या वितरकांचा दावा आहे. इंडियामार्ट कंपनीच्या संकेतस्थळावर आॅनलाइन आॅर्डर देऊन अशी मतदान यंत्रे खरेदी करणे शक्य आहे. शासकीय यंत्रणेत पहावयास मिळणारी ईव्हीएम यंत्रासारखीच हुबेहूब आणि तशीच कार्यप्रणाली असणारी यंत्रे या वितरकांकडे उपलब्ध आहेत. खुल्या बाजारात विक्री अशक्यईव्हीएम मशिन खुल्या बाजारात मिळू शकत नाहीत. असे कोठे घडत असेल तर माहिती घेतली जाईल. त्यानंतर पुढे काय करायचे तो निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी समीक्षा चंद्राकार यांनी सांगितले.
‘ईव्हीएम’ची खुल्या बाजारात विक्री!
By admin | Published: April 03, 2017 5:20 AM