राजकुमार बडोले भाजपातून अजितदादा गटात; सेटिंगमुळे विद्यमान आमदाराचा पत्ता होणार कट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:31 PM2024-10-23T12:31:08+5:302024-10-23T12:35:15+5:30
राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत येथील पक्ष कार्यालयात हा प्रवेश पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघांतील भाजपचे माजी आमदार, मंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी अजित पवार गटात प्रवेश केला. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत येथील पक्ष कार्यालयात हा प्रवेश पार पडला.
महायुतीत अर्जुनी मोरगाव हा मतदारसंघ अजित पवार गटाच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे गेल्यावेळी केवळ ७०० मतांनी पराभूत झालेल्या बडोलेंचे काय, असा प्रश्न होता. मात्र, या दोन पक्षांतील सहमतीने बडोलेंनी अजित पवार गटात प्रवेश करून उमेदवारी पक्की केली. या प्रवेशाने अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा पत्ता कट होणार असल्याचे स्पष्ट झाले. बडोलेंचा मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे चंद्रिकापुरे यांनी पराभव केला होता. मात्र, पाच वर्षांत त्यांच्याबाबत मतदारसंघात असलेली नाराजी पाहता अजित पवार यांनी चंद्रिकापुरे यांना उमेदवारीस नकार दिला.
हा मतदारसंघ सोडायला अजित पवार तयार नव्हते. त्यामुळे भाजपने बडोले यांना उमेदवारीसाठी अजित पवार गटात पाठवले. मित्रपक्षाच्या नेत्यांशी चर्चा करूनच बडोले यांना प्रवेश दिल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
राज्यात पहिल्या दिवशी ५७ उमेदवारांचे अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी राज्यात ५७ उमेदवारांनी ५८ अर्ज दाखल केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरपासून लागू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे.