अशोक चव्हाण यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत; नाना पटोलेंच्या कारभारावर घणाघाती टीका

By यदू जोशी | Published: February 13, 2024 09:56 AM2024-02-13T09:56:14+5:302024-02-13T09:56:43+5:30

ना ताळमेळ, ना जिंकण्याची जिद्द; समन्वयाचा पूर्ण अभाव

Ex Congress Leader Ashok Chavan's exclusive interview to 'Lokmat'; Heavy criticism on the administration of Nana Patole | अशोक चव्हाण यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत; नाना पटोलेंच्या कारभारावर घणाघाती टीका

अशोक चव्हाण यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत; नाना पटोलेंच्या कारभारावर घणाघाती टीका

मुंबई - प्रदेश काँग्रेसच्या कारभारात समन्वयाचा पूर्ण अभाव होता, कोणाचे ऐकायचे नाही, मनाचे करायचे असे चालले होते. पक्ष जिंकावा यासाठीचे कोणतेही नियोजन होत नव्हते, या शब्दात माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी खंत व्यक्त केली. काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

आपण काँग्रेस सोडण्याचे नेमके कारण?
अशोक चव्हाण : निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने कोणतीही तयारी पक्षात दिसत नव्हती. प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे ऐकून पुढे जायचे असते. लोकसभेची लढाई आपण जिंकणार कशी, असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला होता. त्या दृष्टीने चर्चा, अंमलबजावणी होत नव्हती. राजकीय व्यवस्थापन दिसत नव्हते. आताची वेळ ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची, लोकांचे प्रश्न तडीस लावण्याची असताना पक्षांतर्गत प्रशिक्षण वगैरे चालले होते. या सगळ्या कार्यशैलीबद्दल मी बोललो, सूचना केल्या पण त्यांची दखल घेतली गेली नाही. शेवटी किती वाट पहायची? टीमवर्क दिसत नव्हते.

अशा वेळी काही बदल पक्षात घडवून आणण्याऐवजी आपण पक्ष का सोडला?
अशोक चव्हाण : इट व्हॉज टू लेट... खूप उशीर झालेला होता, सांगून अर्थ नाही असे मला वाटले. काही चांगले बदलच दिसत नव्हते. साचेबद्धपणा आलेला होता. किती वर्षे अशीच वाट पाहायची? किती कोंडी होऊ द्यायची?

आपण काँग्रेस सोडली, आता भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. धर्मनिरपेक्ष पक्ष सोडून हिंदुत्ववादी पक्षात जाणार का?
अशोक चव्हाण : भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मी अद्याप केलेला नाही. एकच सांगतो मी हार्डलाइनर नेता कधीही नव्हतो. टोकाची, द्वेषाची भूमिका मी घेतली नाही. भाजपसह सर्वच पक्षांमध्ये असे नेते कालही होते आणि आजही आहेत. विकासाची दृष्टी असलेले अनेक नेते भाजपमध्ये आहेत.

मोदींच्या उपलब्धी मान्य केल्याच पाहिजेत
अशोक चव्हाण : मोदी यांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा प्रकल्प देशात मोठ्या प्रमाणात उभे राहिले. अनेक लोकाभिमुख योजना आणल्या गेल्या या आणि अशा उपलब्धी आपण मान्यच केल्या पाहिजेत. विकसित भारत संकल्पनेपासून चंद्रयानपासूनच्या अनेक गोष्टीही त्यात नक्कीच येतात. काहींचे मतभेद नक्कीच असतील पण विरोधासाठी विरोध करण्याला अर्थ नाही.

Web Title: Ex Congress Leader Ashok Chavan's exclusive interview to 'Lokmat'; Heavy criticism on the administration of Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.