पुणे : घराणेशाही हा शब्द सध्या नकारात्मक अर्थाने देशभर गाजत असताना निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या पूजा हिने मात्र चांगल्या अर्थाने घराणेशाहीची परंपरा चालवली आहे.मुळे निवृत्त होऊन तीन महिनेही पूर्ण होत नाहीत तर पूजा हिने शुक्रवारी लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ११वा रँक मिळवून परराष्ट्र सेवेच्या परीक्षेत यश मिळवले आहे.
मुळे यांनी भारताच्या परराष्ट्र खात्यात सचिव पदावर काम केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही भूमिका बजावली आहे. पूजा हिच्या आई साधना शंकर या देखील प्रशासकीय सेवेत कार्यरत असून त्या दिल्लीच्या मुख्य आयकर आयुक्त आहेत. पूजा हिने सुरवातीपासून वडिलांच्या कामाकडे बघत परराष्ट्र सेवेत जाण्याचा निर्धार केला होता. तिने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. वडिलांच्या कामामुळे तिचे सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिल्ली येथे झाले आहे. ती केवळ २६ वर्षांची असून तिने दिल्ली येथे पदवी घेतल्यावर तिने कोलंबिया विद्यापीठातून समाज व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. वडील निवृत्त झाल्यावर १०० दिवस पूर्ण होण्याच्या आत तिने त्याच विभागात केलेला प्रवेश मुळे कुटुंबासाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया मुळे कुटुंबाने दिली आहे. योगायोग म्हणजे आजच (शुक्रवारी) तिचा वाढदिवस असल्याने तिला अमूल्य भेट मिळाल्याची तिची भावना आहे.