Maharashtra Politics: परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागांना झोडपून काढले. या पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. ऐन दिवाळीतील या संकटामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. त्यांच्या अडचणीही समजून घेतल्या. मात्र, उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे यांना घरात करमत नाही, म्हणूनच ते आता शेतकऱ्यांच्या बांधावर आले, अशी बोचरी टीका माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे.
या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ अन् केवळ घोषणांची अतिवृष्टी आहे. आसूड फक्त हातात ठेवू नका तो वापरा. सरकारला पाझर फुटत नसेल तर घाम फोडा. आमच्याशी गद्दारी केली, शेतकऱ्यांशी करू नका, अशी टीका उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरूनच शिंदे-फडणवीस सरकारवर केली. याला आता प्रत्युत्तर दिले जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांची विचारपूर करण्यासाठी बाधांवर पोहोचलोय म्हणतात, दुसरीकडे १५ ते २० मिनिटांमध्ये दौरा आवरता घेतात, अशी टीकाही लक्ष्मण ढोबळे यांनी केली.
सत्तेत असताना चांगली कामे करावीत, असे वाटले नाही
अडीच वर्ष सत्ता असताना एकही चांगले कामे करावीत, असे त्यांना वाटले नाही. आज शिंदे फडणवीस सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. मात्र, हे त्यांना बघवत नाही, असे सांगत मातोश्रीचा उंबरा न ओलांडता देशात एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून हलगी वाजवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी मोठ्या शिताफीने केले आहे. कोकणातील अनेक घरे वाहून गेली, तेव्हा त्यांनी काडीची मदत केली नाही. पुरामध्ये शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले, तेव्हा त्यांना आधार दिला नाही. आता निवांत वेळ आहे. सगळी आमदार मातोश्रीवरून निघून गेली आहेत. कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे. बसायला लोक कोणीच येत नाहीत. त्यामुळे त्यांना करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात, अशी घणाघाती टीका लक्ष्मण ढोबळे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"