मुंबई - बँक घोटाळ्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर शरद पवार हे आज खुद्द ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार असल्याने त्यांना पाठींबा म्हणून राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते सकाळपासूनचं मुंबईत दाखल होताना पाहायला मिळत होते. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली होती. तर अशा परिस्थितीत माजी आमदार जयवंत जाधव यांनी चक्क पाठीला कॉलेज बॅग लावून विद्यार्थ्याच्या वेशात पक्षाचे कार्यालय गाठल्याचे पाहायला मिळाले.
शरद पवार हे दुपारी २ वाजता 'ईडी'च्या कार्यालयात जाणार असल्याने, त्यांच्या समर्थनात राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही तिथे जमा होणार असल्याने पोलिसांनी जमावबंदी लागू केली होती. तर 'ईडी'च्या ऑफिस जवळच असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात राज्यभरातील कार्यकर्ते जमा होत असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांची मुंबई बाहेरच धरपकड सुरु केली होती.
त्याचप्रमाणे राष्ट्रवादी व 'ईडी'च्या कार्यालयात जाण्यासा पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र अशा परिस्थिती आपण पक्षाचे कार्यकर्ते वाटू नयेत म्हणून नाशिकचे विधान परिषेदेचे माजी आमदार जयवंत जाधव यांनी चक्क पाठीवर कॉलेज बॅग लावून विध्यार्थाची वेशभूषा करत थेट राष्ट्रवादीचे कार्यालय गाठले. विशेष म्हणजे त्यांचावर पोलिसांना सुद्धा संशय आला नाही.
पोलिसांनी राष्ट्रवादी कार्यालय परिसरात सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे त्या परिसरात कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना जमाव करण्यासाठी थांबवले जात होते. मात्र कोणत्याही परिस्थितीत पवारांच्या कारवाई विरोधात पक्षाच्या आंदोलनात सहभागी व्हायचे असे ठरवून आलेले जाधव यांनी गनिमी कावा करत पक्षाचे कार्यालय गाठल्याने ते चर्चेचे विषय ठरले.