खामगाव (जि. बुलडाणा) : खामगाव नगरपरिषदेच्या इमारत बांधकामात झालेल्या कथित अपहार प्रकरणी रविवारी रात्री नाट्यमयरित्या अटक केलेल्या माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश खामगाव सत्र न्यायालयाने सोमवारी दिले. याप्रकरणी पेटलेले राजकीय युद्ध पाहता पोलिसांनी संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. २00६ ते ११ या काळात खामगाव नगरपरिषदेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. यासाठी आर्किटेक्ट नियुक्त करण्यासह इमारत बांधकामातही भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नगरसेवक संदीप वर्मा यांनी पोलिसांकडे केली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार खामगाव शहर पोलिसांनी २९ ऑक्टोबर २0१४ रोजी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा, माजी नगराध्यक्षा सौ. सरस्वतीबाई खासणे, नगरसेवक अनिल नावंदर, दिनेश अग्रवाल, तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी शिंगनाथ, तसेच नाशिक येथील काबरा अँड कन्स्ट्रक्शन कंपनीविरूद्ध भादंवि कलम ४0३, ५0६, ४0८, ४0९, ४१७, ४१८, ४६५, ४६६, ४६७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. इमारत बांधकामाच्या खर्चावर लेखा परिक्षणातही आक्षेप नोंदविण्यात आले होते. याप्रकरणी अटकपूर्व जामीन (पान ५ वर) मिळविण्यासाठी सानंदा यांनी येथील जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता; परंतु २१ डिसेंबर २0१५ रोजी झालेल्या अंतिम सुनावणीदरम्यान खंडपीठाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर सानंदा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेला आदेश गोंधळ निर्माण करणारा होता. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत शासनाचे, तसेच सर्वोच्च न्यायालयातील वकीलांचे मत मागितले होते. त्यानुसार सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात बाजु मांडणारे वकील निशांत कटनेश्वरकर यांनी लेखी मत नोंदवून या प्रकरणाला स्थगनादेश नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ३१ जानेवारी रोजी खामगाव शहर पोलिसांनी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास दिलीपकुमार सानंदा यांना त्यांच्या निवासस्थानाहून अटक केली. सोमवारी दुपारी सानंदा यांना खामगाव सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्षाच्यावतीने अँड. चांडक तर सानंदा यांच्यावतीने अँड.भडंग व बी.के.गांधी यांनी काम पाहिले. न्यायालयाच्या निर्णयाबाबत प्रचंड उत्सूकता होती. सकाळपासूनच सानंदा यांच्या सर्मथकांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. न्यायालयासमोरील रस्त्यावर संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत प्रचंड गर्दी होती. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी न्यायालयासमोरील मुख्य मार्गावरील वाहतूक वळविली होती. न्यायालय परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त लाऊन, परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली होती. सोमवारी, दुसर्या दिवशीही शहर पोलिस स्टेशनसमोरील रस्त्यावर बॅरिकेड कायम होते. अनुचित प्रकार होऊ नये म्हणून, पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. तणावपूर्ण शांततेचे वातावरण दुसर्या दिवशीही कायम होते.
माजी आमदार सानंदा पोलीस कोठडीत!
By admin | Published: February 02, 2016 2:30 AM