वाठार स्टेशन : ‘आर्थिक निकषाचा मुद्दा मी जाहीरपणे मांडला तर मला पक्षातून काढले. आता आपण याच मुद्द्याचे समर्थन करत आहात, याचं आश्चर्य वाटतं, तेव्हा माझं काय चुकलं,’ असा प्रश्न राष्ट्रवादीच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी खासदार शरद पवार यांना पत्राद्वारे विचारला आहे. तसेच ‘आपण मला एक दिवस मुंबईतील माझ्या घरी भेटायला या,’ अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना पाठविलेल्या पत्रात शालिनीताई पाटील यांनी म्हटले आहे की, आपले सरकार सत्तेवर आले तर आम्ही सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेश देताना गुणवत्तेचा विचार करू, आर्थिक निकषाचे धोरण अंमलात आणू, असे लेखी आश्वासन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिले होते. हाच मुद्दा मी त्यावेळी जाहीरपणे मांडला. राजकारणातल्या माझ्या कारकिर्दीला साठ वर्षे झाली आहेत. आपल्यापेक्षा मी राजकारणात आणि वयानेही ज्येष्ठ आहे. १९९९ ते २००९ ही दहा वर्षे मी राष्ट्रवादीची आमदार म्हणून विधानसभेत सन्मानाने बसले. त्याच वेळी आर्थिक निकषावर आरक्षणाची मी प्रथम पक्षांतर्गत मागणी केली. त्यावेळी मला आपण ताकीद देऊन थांबवू शकला असता; परंतु आपण थेट मला काढूनच टाकले. याच मुद्द्यासाठी लाखो मराठा बांधव संघर्ष करत आहेत. त्यावेळी मी वयाची सत्तरी ओलांडली होती. माझ्या सक्रिय कामाची थोडी वर्षे उरली होती. विधानसभेची आणखी एखादी टर्म पूर्ण करून मी आनंदाने निवृत झाले असते; परंतु तशी संधी मला मिळाली नाही, याचा खेद वाटतो. राष्ट्रवादीत राजकीय कारकिर्दीचा सन्मानाने शेवट झाला असता तर अधिक योग्य झाले असते. राजकारणातल्या दीर्घ कारकिर्दीत माझे आणि आपले संबंध नेहमीच तणावाचे राहिले. वसंतरावदादांचे सरकार पाडण्याची घटना असेल किंवा साखर उद्योगात दहा वर्षांपेक्षा अधिक काळ चेअरमनपदावर राहण्याचा विषय असो. माझे आणि आपले टोकाचे मतभेद होते. तरीही आपण मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला. दोनवेळा विधानसभेचे तिकीटही दिले, त्यासाठी मी आपले आभार मानते. आज मी ८५ व्या वर्षांमध्ये वाटचाल करते आहे. घरातल्या घरात ओल्या फरशीवर घसरून मी पडल्यामुळे मला आधाराशिवाय चालता येत नाही. तरीही तब्बेत बरी आहे. माहिमच्या घरी मुलगा, सून, नातवंडांमध्ये सुखी आहे, असेही पत्रात म्हटले आहे.आपण मुंबईला असताना कधीतरी माझ्या घरी भेटावे, यासाठी या पत्राद्वारे मी आपणास आग्रहाचे निमंत्रण देत आहे. मी आपली वाट पाहत आहे,’ असे पत्र माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी शरद पवार यांना पाठविले आहे. तसेच कोरेगाव तालुक्यातील शालिनीताई समर्थक कार्यकर्त्यांनाही त्यांनी पत्रे पाठविली आहेत.