Success Story : अभ्यासाचं वय नसतं असं म्हणतात. माणसाने ठरवलं, तर कुठल्याही वर्षी अभ्यास सुरू करू शकतो आणि यश मिळवू शकतो. याची प्रचिती एका माजी सैनिकानं दिली आहे. तब्बल सतरा वर्षे देशाची सेवा केल्यानंतर वयाच्या चाळीशीत निवृत्त झालेल्या एका जवानानं MPSC परीक्षेत मोठं यश मिळवलं. अश्रय झुरुंगे असं या माजी सैनिकाचं नाव असून, सध्या ते परिवहन खात्यात अधिकारी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अक्षय झुरुंगे यांचा खास सत्कार केला.
अक्षय झुरुंगे दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल अध्यक्ष ज्योती झुरुंगे यांचे दीर आहेत. सध्या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटेठाण येथे वेळ काढून अक्षय यांची भेट घेतली आणि त्यांचा जाहीर सत्कारही केला. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर अक्षय यांच्याबाबत माहिती दिली आहे. अक्षय यांनी 17 वर्षे भारतीय लष्करात सेवा केली. या काळात त्यांनी लेह, सियाचीन, सिलिगुडी आदी गोठवून टाकणाऱ्या थंडीच्या प्रदेशात सेवा केली आहे. तेथून निवृत्त होताना सुभेदार ते पदावर होते.
निवृत्तीनंतर गावी आल्यावर अक्षय झुरुंगे यांनी शेती सुरू केली. विशेष म्हणजे, त्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. यादरम्यान, त्यांनी एमपीएसीचा अभ्यासही सुरू केला. अखेर वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं. अक्षय सध्या परिवहन खात्यात सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी कार्यरत आहेत. निवृत्तीनंतर वयाच्या चाळीसाच्या वर्षी अधिकारी झालेल्या अक्षय यांची परीसरात जोरदार चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांनी झुरुंगे यांची भेट घेत त्यांचा खास सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.