कोल्हापूर प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज आहे. अशा प्रकारे एकाचवेळी दोन जिल्ह्यांत औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे हे काही सहज झालेले नाही. विरोधी पक्ष दंगली घडतील, दंगली घडतील असे सांगत आहेत. औरंगजेब आणि टीपू सुलतानचे उदात्तीकरण हे योगायोग असू शकत नाहीत. एका विशिष्ट समाजाचे लोक हे करतायत. आम्ही हे खपवून घेणार नाही. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी केली. यानंतरच्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले.
शरद पवार हे निवडणुका आल्या की असे प्रयत्न करतात. २०१४ मध्ये आपण पाहिले, आज जे बोललेत तेच ते २०१४ मध्ये बोलले होते. त्यात आणि आजच्या बोलण्यात जराही फरक नाहीय. २०१९ मध्ये ही ते बोलले होते. आता शरद पवारांची आम्हाला सवय झाली आहे. मोदींविरोधात देशात वातावरण दिसतेय असे ते २०१९ मध्येही बोलले होते. त्याच मोदींचे ३०० हून अधिक खासदार निवडून आले होते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
शरद पवार काय म्हणालेले...कोल्हापुरात काल घडलेल्या घटनेवर काल लगेच रस्त्यावर उतरुन त्याला धार्मिक स्वरुप देणं हे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांतील लोकच रस्त्यावर उतरले तर ते योग्य नाही, त्यातून दोन समाजामध्ये कटुता निर्माण होते हे चांगले लक्षण नाही, असे पवार म्हणाले होते. आज सकाळीच शरद पवार यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद झाली.