पुणे : विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोयीचे जावे तसेच शिक्षकांनाही अभ्यासक्रम वेळेत संपवता यावा, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व परीक्षांचे वेळापत्रक शैक्षणिक वर्ष सुरू होताच जाहीर करण्याच्या हालचाली सुरू केले आहेत. परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी सांगितले. विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक परीक्षेपूर्वी एक महिना जाहीर केले जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे व इतर गोष्टींचे नियोजन करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर १५ ते २० दिवसांत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करता येईल का? या दृष्टीने विचार करून विद्यापीठ प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. त्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कोणत्या विषयाची परीक्षा किती तारखेला आहे, हे काही महिने आधीच समजू शकेल. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
वर्षाच्या सुरुवातीलाच समजणार परीक्षेचे वेळापत्रक
By admin | Published: June 09, 2016 1:20 AM