मुंबई : भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे दिवाळीच्या उत्साहात मिठाचा खडा पडू नये, म्हणून अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे. फराळासाठी लागणाऱ्या जिन्नसांचे आणि खवा, माव्याचे ५५ ते ६० नमुने एफडीएने ताब्यात घेतले असून त्यांची तपासणी सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) सुरेश अन्नपूर्ण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.दिवाळीच्या काळात मिठाई, पेढ्यांच्या विक्री जास्त होते. त्यामुळे या काळात खवा, मावा, तेल, तूप, वनस्पती, रवा, मैदा, बेसन, चांदीचा वर्ख यांच्या खरेदीचे प्रमाण वाढते. मागणी वाढल्याने अनेकदा या जिन्नसांमध्ये भेसळ केली जाते. हे टाळण्यासाठी एफडीए दिवाळी आधीच सरसकट धाडी टाकून मालाचे नमुने घेत आहे. अन्नपूर्णे यांनी पुढे सांगितले, की तीन दिवसांपूर्वी मुलुंड येथे तीन धाडी टाकण्यात आल्या होत्या. या धाडींमध्ये ५७५ लिटर भेसळयुक्त दूध पकडण्यात आले. मुलुंडमधील हनुमान पाडा, मुलुंड कॉलनी, गोशाळा रोड, रामनगर येथे या धाडी टाकण्यात आल्या होत्या. दुधात भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
फराळाच्या जिन्नसांच्या ५५ नमुन्यांची तपासणी
By admin | Published: November 07, 2015 3:08 AM