पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळातर्फे घेतली जाणारी दहावीची परीक्षा उद्यापासून (१ मार्च) सुरू होणार असून, येत्या २९ मार्चपर्यंत चालणार आहे. राज्यातील १७ लाख २७ हजार ४९६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यात ९ लाख ५५ हजार १८६ विद्यार्थी व ७ लाख ७२ हजार ३१० विद्यार्थिनींचा समावेश आहे. राज्यातील ४ हजार ५३५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.राज्य मंडळातर्फे सप्टेबर महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार नऊ विभागीय मंडळाच्या वतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल चांगला लागल्याने यंदा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ५ हजारांनी घटली आहे. मात्र, नियमित विद्यार्थ्यांची संख्या ८६ हजारांनी वाढली आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे आगोदर प्रश्नपत्रिका दिली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धातास आगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन म्हमाणे यांनी केले आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अपंग विद्यार्थी ६ हजार ८५६ असून १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांची संख्या ५१ हजार ३८५ आहे. मंडळतर्फे या वर्षीपासून ‘मल्टी स्किल फाऊंडेशन’, ‘आॅटोमोबाईल टेक्नॉलॉजी’ आणि रिटेल असे तीन व्यावसायीक अभ्यासक्रम भाषा विषयाला पर्याय म्हणून सुरू करण्यात आले आहेत. मात्र, या अभ्यासक्रमांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती समोर आले आहे. (प्रतिनिधी)१६,६०,६८१ नियमित परीक्षा देणारे विद्यार्थी६६,८१५ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी
दहावीची आजपासून परीक्षा
By admin | Published: March 01, 2016 1:24 AM