ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.10 - ‘सैराट’ मधील परश्या-आर्ची ही जोडी केवळ तरूणाईच्या गळ््यातील ताईत बनली नाही, तर शाळकरी मुला-मुलांवरही या जोडीने जादु केली आहे. घरात, शाळेच्या आवारात ‘सैराट’ डायलॉग बोलणा-या या पोरांनी आता परीक्षेतही परश्या-आर्चीला नेवून ठेवले आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या पायाभुत चाचणीत एका विद्यार्थ्याने चित्रावरून या दोघांंची गोष्टच लिहिली आहे. शिक्षकांनीही विद्यार्थ्याच्या या कल्पनाशक्तीचे कौतुक करत पाचपैकी चार गुण दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत मागील वर्षीपासून दुसरी ते आठवीपर्यंतच्या वर्गासाठी पायाभुत चाचणी घेतली जात आहे. यावर्षी दि. २८ व २९ जुलै रोजी ही परीक्षा राज्यभरातील १ कोटी ६० लाख विद्यार्थ्यांनी दिली. विद्यार्थ्यांमधील तर्क, अनुमान, आकलन क्षमतेला वाव देण्याच्या मुख्य उद्देशाने ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत अभ्यासक्रम किंवा धड्याखालील एक प्रश्न नसतो. त्यामुळे विविध आकृत्या, चित्र, सारांश, आकडेमोड देवून विद्यार्थ्यांनी त्यावरून उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. प्रत्येक वर्गाच्या क्षमता त्यावयानुसार निश्चित केलेल्या आहेत. त्याप्रमाणे चाचणीमध्ये प्रश्न विचारले जातात.
नुकत्याच झालेल्या या परीक्षेत चौथीच्या वर्गासाठी मराठी विषयाच्या चाचणीत एक चित्र देण्यात आले होते. या चित्रामध्ये एका मुलीसह पाच विद्यार्थी पावसात रस्त्याने जात असल्याचे दाखविण्यात आले होते. त्यातील एक जण रस्त्यात पडलेला दाखविला असून मुलगी छत्री घेवून त्याच्या बाजुला उभी आहे. तर अन्य दोघे जण एकाच छत्रीत त्यांच्याजवळून चालले आहे. तर एक जण एकटाच चाललेला चित्रात दिसतो. हे चित्र पाहून त्यावर गोष्ट लिहिण्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी पाच गुण देण्यात आले होते. एका विद्यार्थ्याने गोष्ट लिहिताना या चित्राला थेट ‘सैराट’मय करून टाकले. खाली पडलेला परश्या, त्याच्या शेजारी उभी असलेली आर्ची आणि एका छर्त्रीत असलेल्या दोघांचे लंगड्या व सलीम असे नामकरण करून टाकले. तर पाचव्या विद्यार्थ्याला ‘स्वराज’ हे काल्पनिक नाव दिले आहे. त्यानंतर परशा व आर्चीमधला काल्पनिक संवाद लिहून गोष्टीचे ‘हॅप्पी एंडिंग’ केले आहे.
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणे हाच पायाभुत चाचणीचा मुख्य उद्देश आहे. त्यादृष्टीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात. आतापर्यंत ‘घोका आणि ओका’ ही पध्दत होती. आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या बौध्दिक क्षमतेनुसार शिक्षण घेणे अपेक्षित आहे. संबंधित विद्यार्थ्याने ‘सैराट’ हा चित्रपट पाहिलेला असावा. चित्रपट किंवा चित्रित माध्यमांच्या विद्यार्थ्यांवर किती परिणाम होतो, हे यावरून दिसतो. मात्र, या विद्यार्थ्याने आपल्या कल्पनाशक्तीने लिहिलेली ही गोष्ट योग्य आहे. त्यासाठी त्याने केवळ चित्रपटातील पात्रांचा आधार घेतला.
- गोविंद नांदेडे, संचालक
- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
- ‘सैराट’ चित्रपटातील गाणी व संवाद प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्याचबरोबर आर्ची, परश्या, लंगड्या आणि सलीम ही पात्रांनी अनेकांच्या मनात घर केले आहे. त्यात लहान मुलेही मागे नसल्याचा प्रत्यय या काल्पनिक गोष्टीवरून येतो. ही गोष्ट पेपर तपासणा-या शिक्षकालाही भावली असून त्यांनी गोष्टीला पाचपैकी चार गुण दिले आहेत.
- पायाभुत चाचणीतील गोष्ट...
शाळेची घंटी वाजली. शाळा सुटली. परशा, आर्ची, स्वराज,
लंगड्या, सलीम ही सर्वजणे निघाली. मधल्या वाटेत आली.
जोराचा मुसळधार पाऊस आला. स्वराज एकटाच होता.
आर्ची व परशा ही दोघे एका छत्रीत होती. सलीम व लंगड्या
एका छत्रीत होती. परशा घसरून पडला.
परशा : मला उचला. व आर्चीने त्याला उठवले.
आर्ची : परशा लागल आहे का.
परशा : हो थोडस लागलं.
आर्ची : तू घरी जा व कपडे बदलून ये. मी तुला औषध लावते. आर्ची परशाला औषध लावते व सर्वजणे आपापल्या घरी जातात.