मुंबई : जुने नियम व विशिष्ट अटी-शर्तींमुळे मेकॅनिकल आणि आॅटोमोबाइल अभियंत्यांना सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करणे शक्य होत नव्हते. जुन्या नियमांत शासनाकडून बदल करण्यात आला असून, त्यामुळे मेकॅनिकल, आॅटोमोबाइल अभियंत्यानाही सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या परीक्षेसाठी अर्ज करता येईल, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली. परिवहन विभागामध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे ही सुरुवातीपासून केवळ मेकॅनिकल आणि आॅटोमोबाइल अभियांत्रिकींच्या उमेदवारांसाठीच राखीव आहेत. नवीन नियमानुसार हलके मोटार वाहन आणि गिअर असलेली मोटारसायकल असे वाहन चालविण्याचे लायसन्स आवश्यक आहे. जड मालवाहू वाहन आणि जड प्रवासी वाहन चालविण्याचे लायसन्स नंतर घेण्याची मुभा असेल. वर्कशॉपमधील अनुभवाबाबतही बदल करत असा अनुभव आता अर्ज करताना आवश्यक नाही. हा अनुभव नंतर घेण्याची मुभा आहे, असे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)
अभियांत्रिकींना खूशखबर
By admin | Published: January 06, 2017 4:15 AM