प्रसाद गो. जोशी
नाशिक : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना मिळालेल्या मतांमध्ये गतवेळेपेक्षा घट झालेली दिसून येत आहे. याला अपवाद ठरले ते वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि समाजवादी पार्टी हे पक्ष!
यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक म्हणजे २५.७५ टक्के मते मिळाली. मागील निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे लढूनही या पक्षाला २७.८ टक्के मते मिळाली होती. यंदा शिवसेनेबरोबर युती असून भाजपची मते २.१ टक्क्यांनी कमी झाली आहेत.शिवसेनेला यावेळी १६.४१ टक्के मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेने स्वतंत्रपणे लढून १९.३ टक्के मते मिळवली होती. याचाच अर्थ युती करूनही यंदा त्यांची २.९ टक्के मते घटली आहेत. युतीमध्ये इतरही अनेक पक्ष असले तरी त्यापैकी अनेकांनी भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढविली. त्यामुळे त्यांच्या मतांची वेगळी नोंद नाही. ते गृहित धरल्यास भाजपच्या मतांची टक्केवारी सध्यापेक्षा अधिकच घटलेली असणार हे निश्चित आहे. आपल्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीलाही मागील वेळेपेक्षाकमी मते मिळाल्याचे दिसत आहे. मागील निवडणूक हे दोन्ही पक्ष वेगवेगळी लढले होते. यंदा ते एकत्र असूनही त्यांच्या मतांची टक्केवारी मात्र वाढू शकली नाही. या निवडणुकीमध्ये कॉँग्रेसला १५.८७ टक्के मते मिळाली आहेत. मागील वेळेला (१८ टक्के) असलेल्या मतांच्या तुलनेत यंदा २.१ टक्क्याांची घट झाली आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचीही मते घटली असली तरी त्याचे प्रमाण त्यामानाने बरेच कमी आहे. मागील वेळेपेक्षा (१७.२ टक्के) राष्ट्रवादीला यावर्षी ०.५ टक्के मते कमी पडली आहेत. राष्ट्रवादीला एकूण १६.७१ टक्के मतदारांची मते मिळाली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही १.४५ टक्के मतांचा फटका बसला आहे. मागच्या वेळेच्या ३.७ टक्के मतांच्या तुलनेत त्यांना यंदा २.२५ टक्केच मते मिळाली आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीलाही कमी मतदान झाले आहे.याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला ०.३७ टक्के मते मिळाली आहेत. मागील तुलनेत ती ०.०३ टक्के कमी झाली आहेत. याशिवाय आप (०.१० टक्के), बहुजन समाज पार्टी (०.९२ टक्के),भाकपा (०.०६ टक्के), मुस्लीम लीग आणि जनता दल (एस) (प्रत्येकी ०.०१ टक्के), अन्यपक्ष व अपक्ष (१८.६२ टक्के) ही अन्य पक्षांची यंदाच्या निवडणुकीतील मते आहेत.केवळ यांचाच फायदाया निवडणुकीमध्ये एमआयएम व समाजवादी पार्टी या दोन पक्षांचा मतांचा टक्का वाढला आहे. लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीबरोबर एमआयएमची युती होती. यावेळी मात्र ते स्वतंत्रपणे निवडणूक लढले व त्यांना १.३४ टक्के मते मिळाली. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना ०.९ टक्के मते मिळाली. म्हणजेच यंदा त्यांना ०.४४ टक्के जादा मतांचा लाभ झाला आहे. त्याचप्रमाणे समाजवादी पार्टीच्या मतांमध्येही ०.०२ टक्क्यांची अल्प वाढ झाली आहे. यावर्षी सपने ०.२२ टक्के मते घेतली आहेत.‘वंचित’ला सर्वाधिक लाभ : यावेळी वंचित बहुजन आघाडीला मतदारांनी हात दिला. गेल्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघ मैदानात होता. त्यांना एका जागी विजय मिळाला होता. तसेच ०.९ टक्के मते मिळाली होती. यंदा प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नावाने निवडणूक लढविली. त्यांना एकही जागा जिंकता आली नसली तरी एकूण ४.६ टक्के मते मिळाली. त्यांना ३.७ टक्के अधिक मतांचा लाभ झाला.