पंकज रोडेकर / ठाणेआई-वडिलांचा घटस्फोट. त्यातच आईने केलेले दुसरे लग्न. त्यानंतर त्या सावत्र पित्याकडून होणारा त्रास. त्यातच घरचे दारिद्र्य. या विळख्यात अडकलेल्या बांग्लादेशातील सख्ख्या बहिणींना एका दलालाने भारतात आणून देहविक्री व्यवसायात ढकलल्याची धक्कादायक बाब एका गुन्ह्यात उघडकीस आली. त्यांना येथे आणण्यासाठी दलाल रासेल शेख याने पैसे मोजल्याची कबुली त्यानेच दिली. तर ठाणे पोलिसांनी त्या सख्ख्या बहिणींची मोठ्या शिताफीने सुटका केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. या बहिणींना कधी एकत्र किंवा कधी वेगवेगळ्या पद्धतीने आतापर्यंत ठाणे, मुंबई, गुजरात येथे पाठवल्याचे तपास पुढे आले आहे.रविवारी १२ मार्च रोजी कोपरी पूर्व परिसरात ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने छापा टाकून रासेल शेख या (दलाल) बांग्लादेशी नागरिकास अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून नवी मुंबईतून आणखी ७ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या चौकशीस चौघे आले असता ते बांग्लादेशी नागरिक असल्याने त्यांना अटक केली. याचदरम्यान, रासेलने बांग्लादेश येथून घरकामाची नोकरी देतो असे सांगून दोन मुलींना नवीमुंबई कोपरागाव येथे आणले असून त्या बंगलोरला जाण्यासाठी वाशी बसस्टॅण्ड येथे गेल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहा. पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. त्यांच्सर चौकशीत रासेलने चांगले पैसे मिळतील अशी फूस लावून नवी मुंबईत प्रवाशी कागदपत्रांशिवाय आणले होते. त्यानंतर त्यांना देहविक्री करण्यास प्रवृत्त केले. तसेच रासेलने अल्पवयीन मुलीशी लग्न करुन तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोक्सोंतर्गत आणि परकीय नागरी कायद्यान्वे गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्या पैकी ७ जणांची रवानगी न्यायालयीन तर ५ जणांची रवानगी २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, सहा. पोलीस निरीक्षक काकासाहेब बर्गे, पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील, पोलीस हवालदार तानाजी वाघमोडे यांनी केली.
सख्ख्या बहिणींची देहविक्रीतून सुटका
By admin | Published: March 22, 2017 1:27 AM