पुणे : अद्याप कोरोनाचा संसर्ग थांबलेला नाही. तो दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी कोरोनाच्या लढाईत पोलिस कर्मचारी स्वत: च्या जीवाची पर्वा न करता लढा देत आहेत. या लढ्यात पोलिस कर्मचारी देखील कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ५५ वयापुढील, तसेच इतर व्याधी असलेल्या पोलिसांना सक्तीच्या ऑनसाईट, बंदोबस्त, फिल्ड ड्युटी मधून वगळण्यात यावे अशी मागणी पुणे बार असोसिएशनचे सदस्य अॅड. विराज करचे पाटील, अॅड. आनंद धोत्रे यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे, अशी माहिती अॅड. पाटील यांनी दिली. कोरोनाने अवघ्या जगात धुमाकूळ घातला असून लाखो लोकाचे बळी घेतले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, पोलिस कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. पोलिस कर्मचारी रात्रंदिवस कडा पहारा देत आहेत. मात्र आता या रक्षकांना कोरोनाची लागण होत असून काही जणांना जीव गमवावा लागला आहे. पोलिस बांधव ड्युटीवर असताना त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यावर त्याच्या कुटूंबियांना देखील विलगीकरण व आरोग्य तपासणीस सामोरे जावे लागत आहे. अकारण पोलीसांचा कुटुंबियांना जिवातास व आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे ५५ वर्षांपुढील व व्याधी, विकार असलेल्या पोलिसांना सक्तीच्या ऑनसाईट, बंदोबस्त, फिल्ड ड्युटी मधून वगळण्यात यावे, तसेच त्यांना कार्यालयीन कामकाज सोपविण्यात यावे, शारीरिक दृष्टीने अनफीट पोलीसांना विशेष बाब म्हणून रजा देण्यात यावी, अशी मागणी या अर्जामध्ये करण्यात आली आहे,