Exclusive: अमित शाह प्रखर राष्ट्रभक्त, तर राहुल गांधी...; संजय राऊत 'रोखठोक' बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 03:19 PM2020-01-15T15:19:00+5:302020-01-15T15:19:47+5:30
संजय राऊत यांना विचारलेल्या नेत्याचा आवडता गुण सांगायचा होता.
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तुलनेत आज अन्य कुठलाच नेता नाही. ते सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत. त्यांनी जगात देशाची प्रतिमा निर्माण केली आहे, अशी स्तुतिसुमनं उधळत शिवसेना नेते आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या महाविकास आघाडीचे एक प्रमुख शिल्पकार खासदार संजय राऊत यांनी आज सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांचा 'प्रखर राष्ट्रभक्त' म्हणून गौरव करत त्यांनी मोदी सरकारच्या धडाकेबाज निर्णयांचं स्वागतच केलं आहे.
पुण्यातील लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात खासदार, संपादक संजय राऊत यांची मुलाखत झाली. 'लोकमत'चे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांच्या प्रश्नांना 'रोखठोक' उत्तरं दिलं. या मुलाखतीचा समारोप 'रॅपिड फायर राउंड'ने झाली. त्यात संजय राऊत यांना विचारलेल्या नेत्याचा आवडता गुण सांगायचा होता आणि त्याला एक सल्ला द्यायचा होता. त्यात त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना 'निष्कपट' म्हणून गौरवलं आणि त्यांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला.
चला, पाहू या कुणाबद्दल काय म्हणालेत राऊत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रचंड मेहनती. त्यांच्यासारखी मेहनत कुणी करणार नाही. देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांना प्रत्येक गोष्ट ठाऊक आहेच. फक्त त्यांनी जरा आसपासच्या सहकाऱ्यांकडे पाहायला पाहिजे.
अमित शाह
प्रखर राष्ट्रभक्त. ज्या प्रकारचे निर्णय घेतले, ते कौतुकास्पद. अत्यंत हिमतीचे. मात्र त्यांनी या देशात लोकशाही आहे हे मान्य केलं पाहिजे. अनेक विषयात विरोधी पक्षाचं मतही समजून घेतलं पाहिजे.
नितीन गडकरी
उत्तम नेते. त्यांनी दिल्लीत जास्त काम केले पाहिजे. सातत्याने नागपूरला येऊन भाषणं करतात. महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यानं दिल्लीत ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे.
राहुल गांधी
मनाने खूप चांगले. निष्कपट. मात्र त्यांनी किमान १५ तास पक्ष कार्यालयात बसणं गरजेचं आहे.
पाहा संजय राऊत यांची संपूर्ण मुलाखतः