संजय पाठक / ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 19 - सांस्कृतिक नाशिकचा मानबिंदू ठरलेल्या नाशिक महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराची रया गेली असून, समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या कालिदासचा जीर्णोद्धार कधी होणार? असा प्रश्न आता राज्यभरातील रंगकर्मींना पडला आहे. बुधवारी रात्री कालिदासच्या दुरवस्थेने त्रस्त झालेल्या नाट्यअभिनेता प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावरच या नाट्यगृहाच्या दुरवस्थेची छायाचित्रे टाकून महापालिकेची इभ्रतच वेशीला टांगली आहे. आता तरी त्याची दखल घेऊन सत्ताधिकारी आणि प्रशासन कार्यवाही करणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेचे महाकवी कालिदास हे एकमेव एक हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह आहे, परंतु त्याची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित केली जात नसल्याने त्याची रया गेली आहे. नाट्यप्रेमी आणि कलावंतांनी वेळोवेळी तक्रारी केल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली जाते. परंतू गेल्या काही वर्षांत वातानुकूलन संयत्र बंद असणे, खुर्च्यांची दुरवस्था, पडदा व्यवस्थित न सरकणे असे अनेक विषय चर्चेला आले असून, कालिदासला पूर्णत: सुस्थितीत आणण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे.
बुधवारी (दि.१८) रात्री प्रशांत दामले यांची भूमिका ‘साखर खालेल्ला माणूस’ हे नाटक होते. त्यावेळी या नाट्यगृहाचे दारिद्र्य दर्शन घडले. त्यावेळी दामले यांनी ही छायाचित्रे काढून व्हॉट्सअॅपचे विविध ग्रुप आणि फेसबुकवर शेअर केले. ‘नाशिक महानगरपालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या नाट्यगृहातील भीषण वास्तव, कसे प्रयोग करणार, कसे येणार रसिक, कसं रंगणार नाटक, ‘गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही हीच अवस्था’ असे त्याखाली नमूद केले असून, त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. महाकवी कालिदासमधील बेसिनची दुरवस्था, अस्वच्छता, प्रसाधनगृहातील घाण, तुटक्या खुर्च्या ही अवस्था त्यातून व्यक्त झाली आहे. महापालिकेच्या प्रशासनाकडे याबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे प्रशांत दामले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या नाट्यगृहात मुळात नाटक या विषयाचा जाणकार व्यवस्थापक असायला हवा, परंतु तो नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महापालिकेने किमान देखभाल दुरुस्ती केली पाहिजे, परंतू ही अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे ते म्हणाले.
महापालिकेच्या कालिदास नाट्य मंदिराच्या दुरूस्तीसंदर्भात मी स्वत: महापालिका प्रशासनाला पत्र दिले होते, परंतु त्याचा उपयोग झालेला नाही. कालिदास नाट्यगृहाला पूर्णवेळ व्यवस्थापक नसतो, असेल तर त्याला नाटकासाठी काय आवश्यक आहे याची माहिती नसते. साफसफाईसाठी कर्मचारी नसतात, त्यामुळे किमान आउटसोर्सिंग केले पाहिजे, तेही होत नाही. स्पीकर्स पूर्णत: नादुरुस्त असून, ते फाटले आहेत. परंतु त्याचीही निगा होत नाही. या समस्यांबाबत कोणाचे उत्तरदायित्वच नाही, अशी अवस्था आहे. महत्त्वाचे म्हणजे शनिवार आणि रविवार नाट्यगृह केवळ नाटकांसाठी असले पाहिजे, परंतु तसे होत नाही आणि नाटकाशिवाय अन्य कार्यक्रमांसाठी कालिदास भाड्याने दिले जाते. त्यालाही मज्जाव केला पाहिजे. खूप प्रयत्न करूनही कालिदासमध्ये सुधारणा होत नाही, त्याचा नाट्यकर्मी आणि रसिकांनाही त्रास होतो. - प्रशांत दामले, नाट्यअभिनेता.