मुंबई - राजकारणाच्या उमेदीमध्ये आयुष्यातील २ वर्ष व्यर्थ गेली. पण जे झालं ते झालं. राजकारणात बदलते प्रवाह देशात आलेले दिसतात त्याचा हा परिणाम आहे. राजकारणात सत्तेचा गैरवापर कसा करायचा? कुटुंबासह त्याची दैना करायची? प्रतिस्पर्धाला बदनाम कसं करायचं? हे अलीकडच्या काळात सुरू झालं. सुडाचं राजकारण करताना वेगळ्या पद्धतीने करा. खोटं राजकारण करू नका अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मी दोषी नव्हतो हे मला आधीपासून माहिती होतं. कोर्टाने हे आता सिद्ध केले. राजकारणात समोरासमोर भांडूया. शेवटी माणूस म्हणून प्रेमाने जवळ यायला पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरू लोकसभेत यायचे तेव्हा विरोधकांना आधी नमस्कार करायचे हे त्यावेळचे राजकारण होते. कोट्यवधीचे भ्रष्टाचार झाले असा आरोप वारंवार करायचा मग लोकांना वाटतं होय, खरचं याने भ्रष्टाचार केला असेल असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्या विधानसभेत १९८५ पासून निवडून येत होतो. उपमुख्यमंत्री राहिलो. विधानसभेच्या निवडणुकीचं राजकारण केले. त्याठिकाणी मला जेलमधून यावं लागलं. तिथे माझ्या बोलण्यावर बंदी होती. हे असं कधी होईल हे मला अजिबात वाटलं नव्हतं. जेलमध्ये २-४ दिवस राहणं वेगळं होतं परंतु निर्दोष असताना २ वर्ष राहणं हा अन्याय नाही का? गुन्हेगार म्हणून माझ्यावर शिक्का बसला होता. परमेश्वरा, तेवढचं आयुष्य दे जे सगळ्यांसमोर मी निर्दोष आहे हे सिद्ध होईल. ते दिलं असंही भुजबळ म्हणाले. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत छगन भुजबळ यांनी नेत्यांचा एक गुण आणि त्याला काय सल्ला द्याल या फेरीत खालील नेत्यांना सल्ले दिले.
नेत्यांचे गुण आणि त्यांना काय सल्ला द्याल
अजित पवार – खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हणून मोकळं होणार, पटापट निर्णय घेतात. परंतु काही गोष्टी राजकारणात जपून बोलाव्या लागतात. ते त्यांनी करावं.
देवेंद्र फडणवीस – अभ्यासू नेते आहेत. परंतु विरोधी पक्षांच्या बाबतीत कधीकधी चुकीचं घडत असेल ते थांबवण्याचा प्रयत्न करा.
राज ठाकरे – बाळासाहेंबांच्या स्टाईलनं अतिशय स्पष्टपणे भाषण करणारे, गर्दी जमवणारे नेते आहेत. राजकारणात सारखं सारखं कधी याच्यासोबत कधी याच्याविरोधात त्यामुळे लोकांचा विश्वास गमावला जातो. कधी भाजपाविरोधात बोलता, कधी समर्थनार्थ बोलता हे सांभाळलं पाहिजं. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडणार हे निश्चित झालं होतं. १२ वर्षांनी मी राज ठाकरेंना फोन केला होता. मी त्यांना ४-५ दिवस न बोलण्याचा सल्ला दिला होता. निर्णय घेताना थोडासा विचार करायला हवा होता. पण तसं झालं नाही.
उद्धव ठाकरे – नगरसेवक, आमदार नसताना मुख्यमंत्रिपद कसं सांभाळणार असं म्हटलं जात होतं. परंतु वेगवेगळ्या लोकांशी बोलून त्यांनी ड्राफ्टिंग पॉवर त्यांनी आत्मसात केली. कोरोना संपल्यावर हळूहळू मैदानात आलं पाहिजे. लोकांशी वन टू वन संवाद साधला पाहिजे. लोकांना भेटण्यासाठी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे.
सर्वांनी वाचन केले पाहिजे
आता सध्या लोकांचा वेळ टीव्ही बघण्यात जास्त जातो. पूर्वी लोकं वाचन करायचे. एकमेकांना भेटायचे, गप्पा गोष्टी करायचे. परंतु आता मोबाईल, टीव्ही आलाय. त्यामध्येच सर्वांचा वेळ जातो. सकाळ झाल्यानंतर रात्र कधी होईल हेच कळत नाही. वाचन केले पाहिजे. वाचनाशिवाय संदर्भ देता येत नाहीत. वाचलंच पाहिजं.
लहानपणी खूप गरिबीत दिवस काढले
आम्ही आजीसोबत भायखळ्यात राहायचो. त्याठिकाणी भाजी विकायचो. आजारी असल्यावर आम्ही जे.जे रुग्णालयात जायचो. एकेदिवसी आजी आजारी होती पण तिच्याकडे आठाणे नव्हते. मी आणि माझा भाऊ भायखळा मार्केटला जायचो. तेव्हा घोडागाडी होती आम्ही त्या घोडागाडीच्या पाठीमागे लटकायचो तेव्हा घोडेवाला चाबुक मारताना जोरदार पाठिमागे फिरवायचा तो चाबूक आमच्या पाठीवर लागायचा अशा आठवणी छगन भुजबळ यांनी सांगितल्या.
कोणती गाणी आवडतात?
माझा आवडता अभिनेता दिलीप कुमार आहे. सुहाना सफर और ये मौसम हसी हे गाणं छगन भुजबळांनी पूर्ण गाऊन दाखवलं.