ठाणे : महापालिका ही दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यांचा अड्डा बनली होती. त्यांच्या तावडीतून ठाणे शहराची सुटका करण्याकरिता संजीव जयस्वाल यांच्यासारखा चांगला प्रशासकीय अधिकारी पाठवला होता. परंतु, त्यांनाच दलालांनी ठार मारण्याच्या धमक्या देण्यापर्यंत मजल गेली, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. आम्ही जयस्वाल यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो, त्यामुळेच आज ठाण्याचा विकास साधला गेला, असेही ते म्हणाले.ठाणे महापालिकेतील भाजपा उमेदवारांच्या प्रचाराकरिता आयोजित विकास संकल्प सभेत ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, विनय सहस्रबुद्धे, आ. संजय केळकर व शहराध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, जयस्वाल यांना मुख्यमंत्री कार्यालयाऐवजी ठाण्याचा विकास करायला धाडले होते. त्यांनी बेकायदा बांधकामांवर धडाकेबाज कारवाई करून दलालांना नेस्तनाबूत केले. त्यामुळे बिथरलेल्या दलालांनी त्यांना ठार करण्याच्या धमक्या दिल्या. खुद्द जयस्वाल यांनीच ही माहिती मला फोनवर दिली. आपण दलालांच्या धमक्यांना भीत नाही. मात्र, आपले काही बरेवाईट झाले, तर सरकारने आपल्या पत्नीची काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांनी आपल्याला केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आम्ही जयस्वाल यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. त्यामुळेच ठाण्याचा विकास करणे जयस्वाल यांना शक्य झाले आहे. परंतु, याचे श्रेय घेण्याचे काम येथील सत्ताधाऱ्यांनी करू नये, असे खडे बोल सुनावले. उद्धव ठाकरे हे प्रचारादरम्यानसारखे कल्याण-डोंबिवली महापालिकेला देण्यात येणाऱ्या साडेसहा हजार कोटींचे काय झाले, असा सवाल करतात. परंतु, त्यासाठीच्या अहवालाचे काय झाले, हे सेनेच्या महापौरांनाच विचारा, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)उद्धव ठाकरे दुटप्पी भूमिका घेतातशिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत प्रचार करताना काँग्रेस सरकारने मेट्रो आणली असे म्हणतात आणि ठाण्याची मेट्रो शिवसेनेने आणली, असे सांगतात. अशी दुपट्टी भूमिका घेऊन कोणाचेही श्रेय लाटण्याचा त्यांना अधिकार नसल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला. मुंबईत आणि ठाण्यात मेट्रो आणण्याचे काम आमच्याच सरकाराने केले असून अल्पावधीतच त्या कामाला सुरुवातही झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्त जयस्वाल यांना ठार मारण्याचे दलालांचे कारस्थान
By admin | Published: February 12, 2017 2:29 AM