ठाणे : अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी वाडा येथील अतुल रामा लोते (२९) या तरुणाला ठाणे जिल्हा विशेष न्यायालयाच्या (पॉस्को) न्यायाधीश मृदुला भाटिया यांनी बुधवारी फाशीची शिक्षा ठोठावली. जिल्ह्यात अशा प्रकारे पॉस्को कायद्यांतर्गत शिक्षा होण्याची ही दुसरी घटना आहे. ही घटना २४ फेब्रुवारी २०१४ रोजी घडली होती. अतुल लोते हा वाड्यातील चिंचपाडा, कुडूस येथे राहणारा आहे. आरोपी अतुल त्यांच्या हातगाडीवर मांसाहारी पदार्थ खाण्यासाठी गेला होता. मात्र, ते घरीच रॉकेल आणि कोळसा विसरून आले होते. ते आणण्यासाठी आरोपी मृत मुलीच्या घरी गेला होता. त्या वेळी बळीत मुलगी इतर मुलांसह घराबाहेर खेळत होती. रॉकेल आणि कोळसा देऊन तो पुन्हा तिच्या घरी गेला. तेथून त्याने मुलीला पोल्ट्री फार्मवर नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. तसेच गळा आवळून हत्या तिची करून बाजूच्या खड्ड्यात तिला फेकून दिले. त्यावर पालापाचोळा टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा विशेष (पॉस्को) न्यायालयात आल्यावर २१ जुलै २०१६ रोजी साक्षीदार तपासण्यास सुरुवात झाली. त्या वेळी ठाणे जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी ७ वर्षीय मुलासह, मृत मुलीचा मामा आणि एकूण १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. वैद्यकीय अहवाल, त्याचे मोबाइल लोकेशन्स तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे या वेळी मांडण्यात आले. पुरावे ग्राह्यमानून विशेष न्यायाधीश मृदुला भाटिया यांनी बुधवारी त्याला दोषी ठरवून फाशी, जन्मठेप आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)
बलात्कारानंतर हत्या करणाऱ्यास फाशी
By admin | Published: September 29, 2016 2:53 AM