लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त (समता वर्ष) राज्यातील विविध कारागृहांतील शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना राज्यमाफी (शिक्षेतून काही दिवसांची सूट) देण्याचा निर्णय गृह विभागाने शनिवारी जाहीर केला. यापूर्वी स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त १९९७ मध्ये राज्य शासनाने अशी राज्यमाफी दिली होती. त्यानंतर सुमारे २० वर्षांनंतर पुन्हा राज्य शासनाने कैद्यांना आनंदवार्ता दिली आहे. महाराष्ट्रातील ९ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १३ खुली कारागृहे आणि एका खुल्या वसाहतीतील बंद्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. हा आदेश १४ एप्रिल २०१६ पासून अमलात येणार आहे. त्यामुळे या दिवशी जामिनावर असलेल्या, पॅरोल, फर्लो रजेवर असलेल्या बंद्यांना राज्यमाफीचा लाभ मिळेल. मात्र कारागृहातून फरार असलेल्या बंद्यांना ही सूट मिळणार नाही. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम १२१ ते १३० अंतर्गत (राज्यविरोधी कारवाईचे गुन्हे) शिक्षा भोगत असलेले बंदी, न्यायाधीन बंदी, केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा भोगत असलेले बंदी, दिवाणी कायद्यांतर्गत शिक्षा भोगत असलेले बंदी, किशोर सुधारालयातील बंदी या सवलतीसाठी पात्र नाहीत, असे शासनाने म्हटले आहे. वऱ्हाड (व्हॉलंटरी अॅक्शन फॉर रिहॅबिलिटेशन अँड डेव्हलपमेंट) यासह अनेक स्वयंसेवी संस्थांनी राज्यमाफीची मागणी केली होती.
समता वर्षानिमित्त कैद्यांना मिळणार शिक्षेतून सूट!
By admin | Published: June 05, 2017 6:04 AM