ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 12 - छत्तीसगड येथील सुकमा येथे माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डा या गावातील जवान नंदराम देवाजी आत्राम शहीद झाले. वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृह राज्यमत्री हंसराज अहीर यांनी शहीद नंदराम यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.
यावेळी बोलताना या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे 10 लाख रु ची मदत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केली . शहिद नंदराम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाहिद स्मारक उभारण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले .
छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी शनिवारी सकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर (सीआरपीएफ) भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले . सुकमा जिल्ह्यातील भेज्जी परिसरातील ही घटना घडली. शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ तुकडीवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी सराव करत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून घेतली आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली.