ऑनलाइन लोकमतसातारा, दि. 1 - म्हशीला साप चावल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या मालकाने तिला तातडीने शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले. येथे उपचार सुरू असतानाच म्हशीचा मृत्यू झाला. प्रवेशद्वारावरच वाढलेल्या अतिक्रमणामुळे मृत म्हशीला बाहेर काढणे अशक्य झाले. शेवटी दोन तासांच्या अथक परिश्रमाने जेसीबीच्या सहाय्याने मृत म्हशीला बाहेर काढून सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याबाबत अधिक माहिती अशी, तारळे येथील बाजीराव जाधव या शेतकऱ्याकडे म्हशी आहेत. रानात चरत असताना म्हशीला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने जाधव यांनी शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना गाठला. उपचार सुरू असताना या म्हशीचा मृत्यू झाला. त्यामुळे वैद्यकीय सूत्रांनी शासकीय सोपस्कर उरकून मृत म्हैस मालकाच्या स्वाधीन केली. म्हशीला बाहेर काढताना सर्वांचीच पंचाईत झाली. कारण, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे मृत म्हशीला बाहेर काढणे अवघड होऊन बसले. सर्व प्रयत्न करूनही मृत म्हैस बाहेर काढता येत नसल्यामुळे सर्वांची त्रेधा-तिरपीट उडाली. कोणी दोरीने ओढा म्हणू लागले तर कोणी मृत म्हशीला उभे करून बाहेर काढायचा प्रयत्न करू लागले; पण म्हशीचे ओझे पेलवत तिला बाहेर काढताना काहींना जखमाही झाल्या. अखेर जेसीबीच्या सहाय्याने मृत म्हशीला बाहेर काढून सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
अतिक्रमणामुळे मेलेल्या म्हशीसाठी कसरत !
By admin | Published: September 01, 2016 7:56 PM