पुणे : महिलांच्या प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय पातळीवयर चर्चा घडविणाऱ्या लोकमत विमेन समीटचे सहावे पर्व सोमवारी (दि. २० मार्च) होणार आहे. ‘अस्तित्व.. तिच्या नजरेतून’ ही नॅशनल एग को-आॅर्डिनेशन कमिटी (एनईसीसी) प्रस्तुत, युनिसेफ तसेच यूएन विमेन यांच्या सहयोगाने आयोजित होणाऱ्या यंदाच्या ‘लोकमत विमेन समीट’ची संकल्पना आहे. या परिषदेत विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या कर्तबगारीला सलाम करण्यात येणार आहे. या वेळी प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन, युनिसेफच्या अॅडव्होकसी व कम्युनिकेशन प्रमुख अलेक्झांड्रा वेस्टरबिक, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. उषा काकडे, अमेरिकन कॉन्सलेटच्या उपमुख्य अधिकारी जेनिफर लार्सन, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू गीता फोगाट, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश भट्ट, अभिनेता सुनील ग्रोवर, राजकीय समालोचक नीरजा चौधरी, व्ही. यू. टेक्नॉलॉजीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डिझाईन प्रमुख देवीता सराफ, अभिनेत्री दिव्या दत्ता, ज्येष्ठ समाजसेविका प्रीती पाटकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील. जग झपाट्याने बदलत असताना, एकविसाव्या शतकातही स्त्रीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ‘अस्तित्व’ या शब्दाला नानाविध कंगोरे प्राप्त झाले असून, जीवनातील प्रत्येक पैलूशी हा शब्द निगडित झाला आहे. हेच कंगोरे उलगडण्यासाठी महिलांच्या प्रश्नांचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमत माध्यमसमूहाने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.विविध क्षेत्रांतील महिलांकडून या चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिलांच्या अनेक प्रश्नांना या उपक्रमामुळे व्यासपीठ मिळाले आहे. त्याचबरोबर, राष्ट्रीय पातळीवरील वक्त्यांनी या परिषदेचे कौतुक केले आहे. गेली ५ वर्षे सातत्याने महिला सक्षमीकरणाची चळवळ उभी करणाऱ्या कर्तबगार महिला या राष्ट्रीय परिषदेत सहभागी झाल्या आहेत. याच यशोगाथेचा पुढील टप्पा म्हणून स्त्रीत्वाचा अनोखा आविष्कार यंदाच्या ‘विमेन समीट’मध्ये अनुभवायला मिळणार आहे.या परिषदेत महिलाविषयक काम करणाऱ्या संस्था, सामाजिक संघटना, महिला डॉक्टर, उद्योजक, गृहिणी आदींना सहभागी होता येईल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सहभागासाठी (०२०) ६६८४८५८६, १४ूँं.ुं‘१ी@’ङ्म‘ें३.ूङ्मे येथे संपर्क साधावा. प्रवेश फक्त निमंत्रितांसाठी आहेत.वुमेन समिटमध्ये विविध विषयांवर परिसंवाद‘लोकमत वुमेन समीट’मध्ये महिलांशी संबंधित विविध विषयांवर परिसंवाद आणि मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचा आहार, चित्रपटातील महिलांचे स्थान, महिला खेळाडूंचे भावविश्व आणि अनुभव, कॉर्पोरेट पार्टनरशिप फॉर सॅनिटेशन, युक्ती, अस्तित्व तिच्या नजरेतून अशा अनेक विषयांचा समावेश आहे.या परिषदेचे सहयोगी प्रायोजक नॅशनल एग को-आॅर्डिनेशन कमिटी, असोसिएट प्रायोजक अजमेरा हाऊसिंग कॉर्पोरेशन, सहयोगी प्रायोजक आर. डी. देशपांडे असून, नॉलेज पार्टनर रोझरी ग्रुप आॅफ स्कूल, एज्युकेशन पार्टनर सिंहगड इन्स्टिट्यूट, हॉलिडे पार्टनर मँगो हॉलिडेज, टीव्ही पार्टनर एनडीटीव्ही प्राईम, ट्रॅव्हल पार्टनर रेव्हेल ग्रुप, हॉस्पिटॅलिटी पार्टनर जेडब्ल्यू मेरियट, आयएसएएस इंटरनॅशनल ब्यूटी स्कूल ब्यूटी हे पार्टनर आहेत. लोकमत सखी सन्मानाने होणार गौरव : महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी राज्यस्तरीय ‘लोकमत सखी सन्मान’ पुरस्काराने शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक, कला व साहित्य, शूरता, व्यवसाय व आरोग्य या क्षेत्रांतील महिलांना गौरवले जाणार आहे. विद्या बालन : विद्या बालन ही राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्री आहे. फिल्मफेअर, स्क्रीन अॅवॉर्डबरोबरच २००४मध्ये शासनाच्या वतीने पद्मश्री पुरस्काराने तिचा सन्मान करण्यात आला. विद्याने मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी संपादन केली. ‘हम पाँच’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर २००५मध्ये ‘परिणीता’ या हिंदी चित्रपटाने तिला अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहानी’, ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटांमधून सशक्त अभिनयाची झलक पाहायला मिळाली. विद्याने निर्मल भारत अभियानाची प्रतिमादूत म्हणून काम पाहिले.अलेक्झांड्रा वेस्टरबिक : युनिसेफच्या अॅडव्होकसी व कम्युनिकेशन प्रमुख आहेत. वेस्टरबिक या जून २०११मध्ये युनिसेफ इथिओपियामध्ये रुजू झाल्या. तेव्हापासून बालकांचे अनारोग्य, उपासमार, निरक्षरता यासारखे मूलभूत प्रश्न, बालकांसाठी रोगनियंत्रण कार्यक्रम, आरोग्य केंद्रे, शालेय आहार योजना असे अनेक प्रकल्प राबविले. जेनिफर लार्सन : जेनिफर या अमेरिकन कॉन्सलेटच्या मुंबईतील उपमुख्य अधिकारी आहेत. मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे यूएस कॉन्सलेट असून, अमेरिकन नागरिकांना अडीअडचणीच्या काळात मदत करणे, त्यांच्या अडचणी सोडविणे आदी काम करते. लार्सन यांनी कॉन्सलेटमधील आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून नाव कमावले आहे.गीता फोगट : गीता फोगट ही भारतातील महिला कुस्तीपटू आहे. भारतासाठी २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये महिलांच्या कुस्तीत तिने सुवर्णपदक जिंकले. हरियाणातील बलाली गावातून आलेल्या गीताला लहानपणापासून वडील महावीर फोगाट यांचे मार्गदर्शन लाभले. फोगट भगिनींनी कुस्तीच्या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. डिसेंबर २०१६मधील ‘दंगल’ हा हिंदी चित्रपट फोगट बहिणींच्या जीवनावर आधारित आहे. नीरजा चौधरी : नीरजा या ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आणि राजकीय विश्लेषक आहेत. ३५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक संघर्षांचा, चढउतारांचा सामना करीत स्वत:चे अस्तित्व सिद्ध केले.देवीता सराफ : देवीता सराफ या व्हीयू टेक्नॉलॉजीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डिझाईन प्रमुख आहेत. २००६पासून त्यांनी कंपनीचा कारभार सांभाळला आहे. देवीता यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून मॅनेजमेंट आॅफ टेक्नॉलॉजीची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स, साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठ येथूनही शिक्षण घेतले.दिव्या दत्ता : दिव्या दत्ता ही अभिनेत्री असून, तिने हिंदी आणि पंजाबी चित्रसृष्टीमध्ये यश मिळविले आहे. तिने काही मल्याळम् आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले. प्रीती पाटकर : पाटकर या ज्येष्ठ समाजसेविका आहेत.पिढ्यान् पिढ्या देहविक्रीचे काम करीत असलेल्या महिलांच्या मुलांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम प्रीती पाटकर गेल्या २८ वर्षांपासून करीत आहेत. कामाठीपुऱ्यात त्यांनी ‘प्रेरणा’ या संस्थेची स्थापना केली. मुंबईतील निर्मला निकेतन महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. महेश भट्ट : महेश भट्ट हे चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व कथाकार आहेत. १९७४पासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेले भट्ट यांनी वयाच्या २६व्या वर्षी ‘मंझिलें और भी हैं’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तेव्हापासून त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.सुनील ग्रोवर : सुनील ग्रोवर अभिनेता असून, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या विनोदी रिअॅलिटी शोमधून त्याला कमालीची लोकप्रियता मिळाली. त्याने साकारलेले ‘गुत्थी’ हे पात्र प्रेक्षकांनी उचलून धरले. त्याने गजनी, लिजंड आॅफ भगतसिंग, हिरोपंती अशा सिनेमांमधून भूमिका साकारल्या आहेत. महिलांच्या प्रश्नांची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होण्यासाठी लोकमत वुमेन समीटची मोठी भूमिका राहिली आहे. मात्र, हे सर्व करताना आपली मुळे कधी विसरली गेली नाहीत. मुंबईतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून चंद्रपूर-गोंदियासारख्या जिल्ह्यातील आडगावातील महिलांच्या आशाआकांक्षा आणि अपेक्षांचे बळ या समीटला आहे. ती ताकद मिळाली आहे लोकमत सखी मंचाच्या माध्यमातून. - विजय दर्डा, चेअरमन (एडिटोरिअल बोर्ड), लोकमत मीडिया प्रा. लि. महिला सबलीकरणाच्या दिशेने नवे पाऊल टाकत लोकमत माध्यमसमूहाने एक आगळीवेगळी चळवळ हाती घेतली आहे. आज विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अशा कर्तृत्ववान महिलांकडून प्रेरणा घेत तळागाळातील इतर महिलांनी पुढे यावे, यासाठी या महिलांचा सन्मान करण्यात येतो. महिलांविषयक विविध मुद्द्यांवर विचारमंथन होत असल्याने राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर ही परिषद मागील तीन वर्षांपासून मार्गदर्शक ठरत आहे. या वर्षीच्या परिषदेतही देशभरातून येणाऱ्या विविध क्षेत्रांतील महिला, त्यांनी केलेले कार्य आणि त्यांचे अनुभव महाराष्ट्रातील महिलांना प्रेरणादायी ठरतील.-आशू दर्डा, अध्यक्षा, लोकमत सखी मंचतिच्या विचारांची, जगण्याची, मतांची दखल म्हणजेच तिचे अस्तित्व. वेगाने बदलणाऱ्या काळाचा साक्षीदार असलेल्या स्त्रीचे अस्तित्व हा समाजाचा आरसा आहे. त्यामुळे तिचे अस्तित्व, अभिव्यक्ती, ‘ती’च्या नजरेतून पाहण्याची हीच ती वेळ आणि हाच तो क्षण! आपल्या असीम कर्तृत्वाने जगाला अचंबित करणाऱ्या स्त्रीचे अस्तित्व तिच्याच नजरेतून जाणून घेण्याची संधी लोकमत माध्यमसमूहाने उपलब्ध करुन दिली आहे. - उषा काकडे, अध्यक्ष, यूएसके फाऊंडेशन
उलगडणार तिच्या नजरेतून ‘अस्तित्व’!
By admin | Published: March 18, 2017 4:43 AM