मुंबई: नुकताच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, दोन्ही पक्षात अनेक महिला आमदार आहेत, पण मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आले नाही. यावरुन मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.
मंगळवारी पार पडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात दोन्ही पक्षातील प्रत्येकी 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यात महिलानांना स्थान न देण्यावरुन विरोधकांकडून टीका होत आहे. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन सरकारवर शरसंधान साधले.
त्या म्हणाल्या, '2019च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या 288 आमदारांपैकी 24 महिला आमदार आहेत. त्यातल्या 12 महिला आमदार भाजपच्या आहेत, तरीही भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य मंत्रिमंडळात एकाही महिलेला मंत्रीपद द्यावंसं वाटलं नाही! खरंच, आपले सत्ताधारी, आपली संपूर्ण राजकीय व्यवस्था इतकी महिलाविरोधी #AntiWomen का आहे?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्या पुढे म्हणतात की, 'महाराष्ट्रात शिवसेना बंडखोर गट आणि भाजप यांच्या युतीचं सरकार स्थापन होऊन 39 दिवस उलटल्यानंतर अखेर काल मंत्रिमंडळ विस्तार झाला. 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात एकही महिला मंत्री नाही. यावर अनेकांनी टीका केली की, राज्य सरकार महिलांना 'दुय्यम' वागणूक देत आहे. पण ही दुय्यम वागणूक नव्हे! राज्यातल्या 5 कोटी मुली, महिला यांचं अस्तित्वच हे सरकार अमान्य करत आहे. For MahaGovt, women doesn't exist,' अशी संतत्प प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली.